चौके ( अमोल गोसावी ) : “आभाळमाया” ग्रुपच्या वतीने बुधवार १६ ऑगस्ट कट्टा येथील प्राथमिक केंद्र शाळा कट्टा नं.१ येथे श्रमदानातून साफसफाई करण्यात आली. आभाळमाया ग्रुपमधील काही सदस्यांची मुले या शाळेत शिकत असून शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून मुलांना त्याचा त्रास होत होता तसेच सरपटणारे प्राणी सुद्धा या परिसरात निदर्शनास येत असल्याचे समजताच खबरदारी म्हणून समीर रावले आणि रामचंद्र उर्फ पॅरी आंबेरकर यांनी जाऊन पाहणी केली आणि श्रमदानातून परिसराची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला . त्यानंतर सरपंच शेखर पेणकर यांच्याशी संपर्क साधून बुधवारी आभाळमाया ग्रूपच्या सदस्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक शाळा परीसराची साफसफाई केली.
आभाळमाया ग्रुपतर्फे सुनील नाईक, गणेश मोरजकर, अमित चव्हाण, समीर रावले, अवधूत डगरे, रामचंद्र आंबेरकर, प्रणित चव्हाण, भाई वाडेकर, अभिषेक रावले, योगेश तारापुरे, शुभम अटक हे सदस्य साफसफाई मोहिमेत सहभागी झाले होते. दरम्यान शेखर पेणकर यांनी शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला असून शाळेच्या डागडुजीचे काम लवकरच पावसाळा संपल्यावर करण्यात येईल. असे सांगितले आणि आभाळमाया ग्रूपच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे प्राथमिक केंद्र शाळा कट्टा नं.१ चे मुख्याध्यापक दिनेश ठाकुर व सहकारी शिक्षक यांनी आभार व्यक्त केले तसेच पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले व आभाळमाया ग्रूपच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.













