खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावच्या म.गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत पांडुरंग कांबळे यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शेर्पे ग्राम पंचायतीची ग्रामसभा नुकतीच सरपंच सौ.स्मिता पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सदर सभेत श्री चंद्रकांत कांबळे यांची सर्वानुमते गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच सिराज मुजावर,माजी सरपंच श्रीम. निशा गुरव, माजी उपसरपंच श्री संजय कापसे,ग्रा.पं.सदस्य श्री शेलार,श्री विजय कांबळे,श्री कापसे ग्रामसेवक मोहन माने,पोलीस पाटील विनोद शेलार,तंतमुक्त समिती माजी अध्यक्ष विलास पांचाळ,परशुराम बेळणेकर,अरुण ब्रम्हदंडे,तसेच धनराज शेलार,मधुकर शेलार,प्रकाश तेली,रेहमान रमदुल,श्री नमसे, आरोग्य सेवक श्री जाधव,पशु सेवक श्री दत्ताराम सावंत आदी मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवून गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी माझी निवड केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी असून यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन व कायदा व्यवस्था चोख राहण्याच्या दृष्टीने गावात शांतता व सलोखा राखण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने आपण काम करणार असल्याचे, यावेळी शेर्पे गावचे नवनिर्वाचित तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले.












