लेख पाठविण्याचे डॉ. सई लळीत आणि डॉ. संदीप नाटेकर यांचे आवाहन
ओरोस (प्रतिनिधी) : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि स्वतंत्र कोंकण राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष स्व. प्राचार्य महेंद्र नाटेकर यांची पहिली पुण्यतिथी १६ मार्च, २०२३ रोजी असून या पहिल्या स्मृतीदिनी त्यांच्याविषयीच्या लेखांचा स्मृतीग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी लेख पाठविण्याचे आवाहन डॉ. सई लळीत आणि डॉ. संदीप नाटेकर यांनी केले आहे.
प्राचार्य नाटेकर सरांचा लोकसंग्रह प्रचंड होता. ध्येयाप्रती जिद्द, निष्ठा, प्रामाणिकपणा अपरिमित होता. त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांचे अपुरे कार्य पुढे नेणे, त्यांची स्मृती सतत जागृत ठेवणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. यासाठीच सरांच्या पहिल्या स्मृतीदिनी त्यांच्याविषयीच्या लेखांचा स्मृतीग्रंथ प्रकाशित करण्याचा संकल्प त्यांनी स्थापन केलेल्या ‘माधुरी-महेंद्र प्रतिष्ठान’ने सोडला आहे. प्रा. नाटेकर सरांचे कार्य, विचार, आपले अनुभव, आठवणी यावर आधारित असा सुमारे आठशे शब्दांचा लेख शक्यतो saeelalit@gmail.com या मेलवर किंवा ईमेल वापरत नसल्यास 8208531989 या वॉटस्अपवर २० फेब्रुवारीच्या आत पाठवावा. लेखात आपले नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर न चुकता द्यावा. आपल्या संग्रही सरांचे काही फोटो असतील, तर तेही पाठवावेत. शब्दमर्यादा आणि कालमर्यादा काटेकोर पाळावी, असे आवाहन डॉ. सई लळीत (संध्या महेंद्र नाटेकर) व डॉ. संदीप नाटेकर यांनी केले आहे.