चौके- गोड्याची वाडी येथील घटना
चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील चौके – गोड्याचीवाडी येथील युवा व्यावसायिक राजकमल वामन गावडे (३६) या युवकाचा रविवारी सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या पंपाच्या थ्री फेज वायरची दुरुस्ती करताना जोरदार धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की चौके- गोड्याचीवाडी येथे वराहपालनाचा व्यावसाय करणारा युवा व्यावसायिक राजकमल वामन गावडे हा रविवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या दरम्यान घरापासून काहीश्या अंतरावर असलेल्या वराहपालन शेड मध्ये पाणी सोडायला गेला असता पंपाने पाणी येत नसल्याने शेडच्या मागे पंपाच्या तुटलेल्या वायरला जोडताना जोरदार धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. दुपारपर्यंत राजकमल घरी न आल्याने त्याच्या फोनवर पत्नीचे वारंवार फोन केले फोनची रिंग वाजत होती. घरात वृध्द वडील राजकमल यांचा तीन वर्षाचा मुलगा व चार महिन्यांची गरोदर असलेली पत्नी होती. राजकमल घरी न आल्याने अखेर पत्नी ३.३० वाजता शोधण्यासाठी गेली असता जमिनीवर राजकमल उलटा पडलेला दिसला. राजकमला उठवायला गेलेल्या पत्नीलाही विजेचा धक्का लागला व बाजूला झाली व सुदैवाने वाचली यानंतर सदर घटना घरी येत सांगताच वाडीतील ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेत चालू विद्युत पुरवठा बंद केला. यानंतर पोलीस पाटील राजू गावडे यांना घटनेची माहिती दिली. पोलीसपाटील यांनी मालवण पोलीस ठाणे यांना माहिती दिली . मालवण ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, पोलिस शुभाष शिवगण, अजय येरम, डी.व्ही जानकर यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. आणि पुढील तपास करत आहेत. यावेळी वैद्यकीय अधिकारी कुबेर मिठारी यांच्यासह, चौके सरपंच गोपाळ चौकेकर, राजा गावडे, संतोष गावडे पापा मांडलकर तसेच गोड्याचीवाडी ग्रामस्थ चाकरमानी यांनी घटानास्थळी धाव घेतली. याघटनेने ऐन चतुर्थी सणाला अवघे दोन दिवस असताना चौके गोड्याचीवाडी परिसर शोकाकूल झाला. रविवारी सायंकाळी उशीरा मयत राजकमल गावडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेतकरी वामण गावडे याना पत्नी पाठोपाठ कर्ता मुलगा गेल्याने मोठा आघात
चौके गोड्याचीवाडी येथील वामन गावडे हे शेतकरी कुटुंब. वामन गावडे हे आजारपण व वृध्दापकाळाने ग्रस्त झाले आहेत. गतवर्षी पत्नीचे आजारपणात निधन झाले होते. त्यांचा मोठा मुलगा विवाहित राजकमल यांने शेतीबरोबरच अनेक व्यावसाय केले. गेली काही वर्षे वराहपालनाचा व्यावसाय करत होता. चौकेसह मालवण तालुक्यात व्यावसायामुळे त्यांची ओळख होती. राजकमल याला तीन वर्षाचा लहान मुलगा असून पत्नी गरोदर आहे. ऐन चतुर्थी सणाच्या तोडांवर आकस्मित दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुंटुबांवर मोठा आघात झाला आहे. राजकमल याचा पश्यात पत्नी, मुलगा, वडील भाऊ भावजय असा परिवार आहे.













