ढोल ताशांच्या गजरात बाप्पांची मिरवणूक
खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण मध्ये गौरी – गणपतीचा सण अगदी घरोघरी उत्साह व आनंदीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.दीड दिवस आणि पाच दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यानंतर सोमवारी सात दिवसांच्या गणपतीचे भक्ती भावाने विसर्जन करण्यात आले. यावेळी खारेपाटण बाजारपेठ मधून ढोल ताशांच्या गजरात गणपतीच्या विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या होत्या. यामध्ये आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता. यावर्षी कोकणात गणेश चतुर्थीनिमित मुंबईकर चाकरमानी तथा गणेशभक्त मोठ्या संख्येने आपआपल्या गावात दाखल झाले होते. गेले सात दिवस गणपतीच्या आरती व भजने यांनी सर्वच परिसर मंत्रमुग्ध झाला होता. खारेपाटण मध्ये सोमवारी ७५ % पेक्षा अधिक घरघुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. खारेपाटण येथील घोडेपाथर बंदर येथे शुक नदीत सर्व गणपतीचे मनोभावे पूजा अर्चा करून विसर्जन करण्यात आले. तर खारेपाटण बाजारपेठेतून गणपतीच्या विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत वाजत गाजत रात्री ८.०० वाजेपर्यंत काढण्यात आल्या होत्या. यामध्ये महिला – पुरुष व तरुण – तरुणी लहान मुले बेधुंद आनंदाने नाचताना दिसत होते व गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर असा जयघोष करीत बाप्पाला निरोप देत होते. दरम्यान खारेपाटण मध्ये इतर सर्व गणपती अनंतचतुर्दशी दिवशी जाणार असल्याचे समजते.












