सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली आणि कुडाळ मध्ये 7 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेले कॉमेडी चे सुपरस्टार चे शो होणार की नाही ? अशी अवस्था असतानाच कुडाळ मधील शो कॅन्सल झाला आणि कणकवलीतलाही शो कॅन्सल होणार की काय अशी स्थिती असताना कणकवली शहरातील ड्रीम इव्हेंट च्या फौलादी मनाच्या पाच पांडवांनी हा शो अगदी हाऊसफुल्ल च्या गर्दीत करून दाखवला. प्रतिकूल परिस्थितीत ही ड्रीम इव्हेंट ने हा शो यशस्वी केला नाही तर चक्क हाऊसफुल्ल करून दाखवला त्याबद्दल त्यांच्या जिद्दीला सलाम ! चला हवा येऊ द्या फेम डॉ निलेश साबळे, कॉमेडी चा तडका लावणारे भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेसशपुरे , श्रेया बुगडे आणि जगताप यांच्या कॉमेडी ने कणकवलीकर आणि सिंधुदुर्गवासियांना अगदी पोट धरून खळखळून हसायला लावले. निखळ मनोरंजनाचे अडीच तास कसे संपले हेही समजले नाही. मुळातच सिंधुदुर्गात मागील आठवड्यात अगदी बहुचर्चित झालेला डान्सर गौतमी पाटील चा डी जे डान्स शो हा कार्यक्रम डिक्लेअर झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याची कारणे महाराष्ट्रात अन्य ठिकाणी गौतमी च्या शो ला जो विरोध होतोय त्या टोकाची नसली तरी थोफिफार साधर्म्य असणारी होती.अशातच कुडाळ आणि कणकवली मधील 8 ऑक्टोबर चा गौतमीचा डान्स शो तांत्रिक कारणास्तव रद्द झाल्याचे आयोजकानी जाहीर केले. 7 ऑक्टोबर च्या कॉमेडी सुपरस्टार चा कुडाळमधील सकाळी 11 वाजताचा शो सुद्धा रद्द झाला. मग कणकवलीत 800 प्रेक्षक आसन व्यवस्था असलेला सायंकाळी 5 वाजता असलेला कॉमेडीचे सुपरस्टार कार्यक्रम होणार की नाही हीसुद्धा शंकाच होती.मात्र मुख्य आयोजक देवगड ऍम्युजमेंट चे धैर्यशील पाटील यांची साथ घेऊन कणकवली शहरातील ड्रीम इव्हेंट चे पाच पांडव असलेल्या गौरव मुंज, योगेश ताम्हाणेकर, चाणी जाधव, परेश कांबळी, राकेश काणेकर यांनी कडी मेहनत घेत हा शो हाऊसफुल्ल करून दाखवला. करून दाखवला हे शब्द मी जाणीवपूर्वक नमूद केले आहेत. साऱ्या अडचणींवर मात करत ड्रीम इव्हेंट च्या या पाच बोटांनी आपली वज्रमुठ आवळली आणि ‘होय आम्ही करू शकतो ‘ हे दाखवून दिले. मुळातच देवगड ऍम्युजमेंट आणि ड्रीम इव्हेंट ने सिंधुदुर्गातील पर्यटन बहरावे, येथील निसर्गसौंदर्य परराज्यातील, परदेशातील पर्यटकांनी येऊन पाहावे, येथे राहावे , आलेल्या पर्यटकांचे मनोरंजन व्हावे यासाठी विकएंड टुरिस्ट पॅकेज च्या माध्यमातून आराखडा बनवला आहे. हाऊसफुल्ल झालेला शो दिसत असला तरी त्यामागची आर्थिक मानसिक कसरत फार मोठी आहे, नफा तोट्याचेही गणित तसेच आहे.या कार्यक्रमातून ड्रीम इव्हेंट ला मिळालेला फायदा असेल तर तो हाच आहे की डॉ निलेश साबळे यांच्या सारख्या दिग्गजांसमोर आम्ही ठरवले की करून दाखवतोच हा विश्वास साबळे आणि त्यांचा कलाकार टीम ला ड्रीम इव्हेंट ने दिला. कॉमेडी चे सुपरस्टार चा कणकवलीत झालेला हा हाऊसफुल्ल शो म्हणजे भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रीम इव्हेंट च्या माध्यमातून होऊ घातलेल्या टुरिस्ट प्रोजेक्ट ची मुहूर्तमेढ होईल यात कुठलाही किंतु नाही.













