स्वतःच्या आईचा खून करणाऱ्या दीपक दळवी चा जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : स्वतःची वयोवृद्ध आई कै. राधाबाई विष्णू दळवी ( वय 70, रा. विलवडे ,ता. सावंतवाडी ) हिला मारहाण करून जीवे ठार मारणाऱ्या दीपक विष्णू दळवी ( वय 42, रा. विलवडे ता सावंतवाडी ) याचा जामिन अर्ज जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आपली आई इतरांना आपल्याबद्दल काहीतरी खोटेनाटे सांगते या रागातून आरोपी दीपक दळवी याने राहत्या घरात मयत राधाबाई हिच्या छातीवर हाताच्या ठोशाने मारहाण करून डोक्यावर लाकडाने प्रहार केला होता. या मारहाणीत राधाबाई हीचा जागीच मृत्यू झाला होता. साळसूदपणाचा आव आणत आरोपी दीपक याने पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंदही केली होती. हा गुन्हा 25 ऑगस्ट 2022 रोजी घडला होता. मात्र पोस्टमार्टेम मध्ये मयत राधाबाई हीचा मृत्यू छातीवर मारहाण होऊन आणि डोक्याला मार लागून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनतर पोलिसानी सूत्र हलवत आरोपी दीपक कडे चौकशी केली असता त्यानेच हा खून केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आरोपी दीपकविरोधात आयपीसी 302 व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करून त्या ला अटक करण्यात आली होती. सध्या न्यायायीन कोठडीत असलेल्या दीपक याने केलेल्या जामीन अर्जाला हरकत घेत सरकारी वकील देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयासमोर मांडले. साक्षीदारांची घरे आरोपी च्या घरालगत असून तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, आरोपीच्या दारूच्या व्यसनाने त्याची पत्नी त्याच्यापासून दूर राहत आहे, आपल्या पत्नीवरील रागातून तो तिच्या जीविताला धोका पोचवू शकतो, आरोपी हा त्याच्या घरात आई नंतर एकटाच असल्यामुळे तो केसच्या तारखांना हजर राहण्याची शक्यता कमी आहे.सरकारी वकील देसाई यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी आरोपी दीपक दळवी चा जामीन अर्ज नामंजूर केला.

error: Content is protected !!