खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली शिक्षण संस्था कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग संचलित कै.सौ.इंग्रेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालय कणकवली या डी एड कॉलेजच्या विद्यार्थी व अध्यापकानी व्यक्तिमत्व विकास या विषयाअंतर्गत आदर्श शाळा क्षेत्रभेट म्हणून नुकतीच जि.प. केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला सदिच्छा भेट देऊन संपूर्ण शाळेची पाहणी केली.व महाराष्ट्र राज्यातील एका नामवंत आदर्श मॉडेल स्कूलला भेट दिल्याने समाधान व्यक्त केले.
कणकवली अध्यापक विद्यालयाचे प्रथम व द्वितीय वर्षाचे सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी तसेच प्राध्यापक पी.ए.यादव, प्रा.पी.ए. वळवी व प्राध्यापिका एस डी गायकवाड आदी अध्यापकचार्य यावेळी उपस्थित होते. खारेपाटण केंद्र जि.प.केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी सर्व मान्यवर पाहुण्याचे स्वागत केले.तर खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी यांच्या शुभहस्ते कणकवली डी एड कॉलेज अध्यापक वर्गाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
व्यक्तिमत्व विकास व शाळा क्षेत्रभेट करीता आलेल्या या प्रशिक्षणार्थी अध्यापक विद्यार्थी यांनी खारेपाटण केंद्र शाळेच्या शालेय अभीलेख,शाळेचे अंतरंग व बाह्यरंग तसेच शालेय तासिका टाचन अध्यापन कौशल्य विद्यार्थी हितगुज व संवाद आदी शाळेशी निगडित बाबी जाणून घेतल्या तर लोकसहभागातून शाळांची निर्मिती व विकास या विषयी माहिती जणू घेतली.खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी सर्व प्रशिक्षणार्थी अध्यापक विद्यार्थ्याना शाळेविषयी व शाळेच्या एकूणच कामकाजाविषयी माहिती दिली.
खारेपाटण जि.प.केंद्र शाळा ही राज्यातील एक महत्वाची व सुंदर आदर्श शाळा असून,अशा शाळेत भविष्यात आपल्याला काम करायची संधी मिळाल्यास निश्चित आवडेल. अशा प्रतिक्रिया क्षेत्र भेटी करीता खारेपाटण केंद्र शाळेत आलेल्या प्रशिक्षणार्थी अध्यापक वर्गाने यावेळी व्यक्त केल्या.















