“आवाज दो ; हम एक है!” काळसे रमाईनगर ग्रामस्थांचा एल्गार,

अपघातात मयत व जखमींना न्याय मिळण्यासाठी केले रास्ता रोको आंदोलन

डंपरमालक वेळेत हजर न झाल्याने घेतला आक्रमक पवित्रा

चौके (प्रतिनिधी) : गुरुवारी सायंकाळी काळसे होबळीचामाळ येथे झालेल्या भीषण अपघातात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आज दुपारनंतरही अपघात ग्रस्त डंपरचा मालक न आल्याने मयताचे नातेवाईक आणि काळसे रमाईनगर येथील ग्रामस्थांनी आज दुपारी आणि सायंकाळी दोन वेळा रस्त्यावर ठिय्या मारत रास्ता रोको केला. अपघातातील मयत तसेच जखमी महिलांना न्याय मिळावा यासाठी जोपर्यंत डंपर मालक पोलीस स्थानकात किंवा घटनास्थळी हजर होऊन नातेवाईकांच्या मागण्या पूर्ण करून अपघातग्रस्त जखमी आणि मयतांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मयत रुक्मिणी काळसेकर यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला.

दुपारच्या आंदोलनाची माहिती पोलीस पाटील विनायक प्रभु यांनी पोलीस स्थानकात देताच मालवण पोलीस उपनिरीक्षक झांजुर्णे , पोलीस हवालदार एस. एस. शिवगण , एच. व्ही. पेडणेकर , सुशांत पवार , धोंडी जानकर , पो. कॉ. प्रतिक जाधव , कैलास ढोले ही पोलीसांची टीम आंदोलनस्थळी दाखल झाली आणि आंदोलनकर्त्या नातेवाईक व ग्रामस्थांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

या चर्चेतही समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने रमाईनगर ग्रामस्थांनी सायंकाळी पुन्हा रस्त्यावर ठिय्या मारत रास्ता रोको केले या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर , सरपंच विशाखा काळसेकर , कुडाळ नगरपंचायत नगरसेवक तथा गटनेता विलास कुडाळकर माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव , भूपेश चेंदवणकर, राजन आंबेरकर यांच्यासह काळसे रमाईनगर ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी दोन्ही बाजुची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यावेळी आंदोलनात सहभागी महिला अधिक आक्रमक झाल्या आणि गावातील संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी गतीरोधक घालण्याची मागणी केली आणि मयत रुक्मिणी काळसेकर यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांकडे केली.

दरम्यान सायंकाळी अपघातातील डंपरचा मालक सायंकाळी चंदगड येथून मालवण पोलीस स्थानकात हजर झाल्यानंतर मयत रुक्मिणी काळसेकर यांचा मुलगा दीपक काळसेकर , माजी सभापती राजेंद्र परब , प्रमोद काळसेकर आणि नातेवाईक यांनी डंपर मालकासोबत चर्चा करून मयत आणि जखमी महिलांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी डंपर मालकाने ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेउन प्रमोद काळसेकर , दीपक काळसेकर यांनी दूरध्वनी वरून आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर काळसे रमाईनगर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले पण काळसे गावातील रस्त्यावर चार दिवसात गतिरोधक न घातल्यास आणि अवजड वाहनांना वेगमर्यादा घालून न दिल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिला. रात्री शोकाकुल वातावरणात अपघातात मयत झालेल्या रुक्मिणी काळसेकर यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले.

error: Content is protected !!