कलमठ मधील शिक्षकेची 38 लाखाची फसवणूक…..!

महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल…..!

कणकवली (प्रतिनिधी):- वाढदिवसाचे गिफ्ट पाठविण्याचे सांगून कलमठ येथील एका शिक्षिकेला ३८ लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे ०९ ते २३ ऑक्टोबर यादरम्यान टप्प्याटप्प्याने ही रक्कम त्या शिक्षिकेने इंग्लंडमधील दोघा आरोपीच्या बँक खात्यावर पाठवली आहे. याप्रकरणी आज कणकवली पोलिसात ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

कलमठ येथील त्या शिक्षिकेला गणेशोत्सव कालावधीत क्रिस अँड्रीज नावाच्या व्यक्तीने व्हाट्सअप नंबर वर हाय असा मेसेज पाठवला होता. त्याला त्या शिक्षिकेने रिप्लाय दिला. त्यानंतर महिनाभर क्रिस अँड्रीज आणि त्या शिक्षिकेच्या व्हाट्सअप वरून चॅटिंग सुरू होते. क्रिस अँड्रीज या व्यक्तीने ऑक्टोबर महिन्यात आपला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मी सर्व मित्रांना 50 हजार पाउंड कॅश असलेले बर्थडे गिफ्ट पाठवले आहे. तुम्हालाही पाठवणार आहे. तुमचा पत्ता द्या असे क्रिस अँड्रीज याने त्या शिक्षिकेला सांगितले. सुरुवातीला त्या शिक्षिकेने गिफ्ट नको असे सांगितले. नंतर खूप आग्रह झाल्यानंतर त्या शिक्षिकेने आपला पत्ता क्रिस अँड्रीज याला दिला आणि लवकरच गिफ्ट तुमच्या घरी पोहोचेल असे सांगितले.

दरम्यान 9 ऑक्टोंबर रोजी त्या शिक्षिकेला एका अनोळखी नंबर वरून फोन आला. फोन उचलल्यानंतर सुनीती नावाच्या महिलेने हिंदी भाषेतून संभाषण केले. यात सुनीतीने हिने आपण कस्टम कार्यालयातून बोलत आहोत. तुमच्या नावे लंडन येथून क्रिस अँड्रीज या व्यक्तीने गिफ्ट पाठवले आहे. ते गिफ्ट स्कॅन केले असता त्यामध्ये ५० हजार पाऊंड ही विदेशी करन्सी आढळून आली आहे. विदेशातून बेकायदा करन्सी मागविल्या प्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु आपण हे प्रकरण मिटवतो तसेच गिफ्ट मधील करन्सी तुम्हाला मिळून देऊ, त्या बदल्यात ५ लाख रुपये कस्टम ड्युटी व इतर टॅक्स पेमेंट करावे लागेल असे सांगितले. त्यानंतर घाबरलेल्या त्या शिक्षिकेने सुनीती नावाच्या महिलेने पाठविलेल्या अकाउंट वर सुरुवातीला २ लाख आणि त्यानंतर ३ लाख रुपये पाठवले. त्यानंतर विविध कर आणि इतर शासकीय फी यासाठी ९ लाख ३ हजार ५०० त्यानंतर पुन्हा १२लाख ३ हजार ५००, त्यानंतर पुन्हा १० लाख ५० हजार अशी एकूण ३८ लाख ३ हजार ५०० रक्कम पाठवली

एकूण ३८ लाख ३ हजार५०० पाठविल्यानंतर देखील पुन्हा १५ लाख रुपयांची मागणी झाली, त्यामुळे क्रिस अँड्रीज आणि सुनीती या दोहोंकडून आपली फसवणूक होत असल्याचे त्या शिक्षिकेच्या लक्षात आले.त्यामुळे आज त्या शिक्षिकेने कणकवली पोलीस ठाण्यात येऊन आपली ऑनलाइन माध्यमातून फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्या महिलेच्या तक्रारीवरून कणकवली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.

error: Content is protected !!