बांदा (प्रतिनिधी) : गोव्यातून मुंबईच्या दिशेने कंटेनर मधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर बांदा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई करत १२ लाख ३९ हजार ६०० रुपये किमतीच्या दारुसह एकूण १५ लाख ३९ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. काल राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मोठ्या कारवाई नंतर पोलिसांनी मोठी कारवाई केल्याने बेकायदा दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
याप्रकरणी चालक विठ्ठल दत्तू रुपनूर (रा. बोळेगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद याचेवर अटकेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली. कारवाईत ३ लाख रुपये किमतीचा आयशर कंटेनर, व गोवा बनावटीच्या दारूचे विविध ब्रँडचे १६४ खोके ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पडवळ, पोलीस कर्मचारी मयुराज कमतनुरे, प्रथमेश पोवार, राजू शेळके, गवस यांनी केली.