वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत. उमेदवारांना धमकावून, पैशाचे आमिष देऊन काही ठिकाणी उमेदवारी मागे घ्यायला लावली आहे. हा त्यांचा शेळपटपणा आहे. तरीही आमचे उमेदवार खंबीरपणे उमेदवारी लढत आहेत. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. ही लढाई जनशक्ती नक्की जिंकेल असा विश्वास माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊत वैभववाडी तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेना कार्यालय वैभववाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख नंदू शिंदे,गुलझार काझी, संतोष पाटील, संदीप सरवणकर , आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना राऊत पुढे म्हणाले, पालकमंत्री राणे आकांडतांडव करीत आहेत.त्यांना सत्तेची मस्ती, व घमंड आली आहे. जिल्ह्याचे राजे महाराजे असल्या सारखे वागत आहेत. तरी बरे झाले कणकवलीकरांनी नगरपंचायत मध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. त्याप्रमाणे याही निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असे राऊत यांनी म्हटले आहे.पालकमंत्री विरोधकांना निधी देणार नाही अशी धमकी वारंवार देत आहेत. पालकमंत्र्या सारख्या संविधानिक पदावरील व्यक्तीने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्याबाबत आम्ही राज्यपाल यांच्याकडे तक्रार करू. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. असे सांगत त्यांनी हिंमत असेल तर आमच्या निवडून येणाऱ्या उमेदवारांचा निधी थांबवून दाखवावा. त्यांच्या धमकीला कोणीही भीक घालू नये. आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाचे पालकमंत्री राणे व खासदार राणे यांनी फुकाचे श्रेय घेऊ नये. याचे श्रेय हे तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे आहे. तसेच यासाठी आपण खासदार म्हणून वेळोवेळी त्यांच्याकडे या मार्गासाठी पाठपुरावा केला होता. वैभववाडी कोल्हापूर मार्ग पुढे विजयदुर्ग बंदराला जोडवा. अशी मागणी आम्ही केली आहे.तुमचे पिताश्री खासदार झाल्यानंतर यासाठी काय पाठपुरावा केला हे दाखवून द्यावे असे आवाहन करीत राऊत पुढे म्हणाले, याचे श्रेय घेताना सुरेश प्रभू यांचे नावही पालकमंत्र्यांनी घेतले नाही. राज्य सरकारने यासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कारकिर्दीत राज्याची मंजुरी झाली होती.केंद्राच्या अर्थसंकल्पाचे पिंग बुक प्रसिद्ध होत नाही. तोपर्यंत काही खरे नाही. पालकमंत्र्यांनी राज्य शासनाचा पन्नास टक्के वाटा देणार आहे. यासाठी पालकमंत्री काय करतात ते पाहूया असेही राऊत म्हणाले. सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प खूप महत्वाचा आहे.
तर सुशांत नाईक म्हणाले =
बिनविरोध निवडणूक हा नितेश राणेंचा करिष्मा नसून पैशाचा करिष्मा आहे. त्यांच्यात लढण्याची हिंमत नाही. म्हणून अशा प्रकारे बिनविरोध निवडणुकी करण्याचा त्यांचा डाव आहे. बिनविरोध निवडणुका करून त्यांनी लोकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला आहे पालकमंत्री नितेश राणे व सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. अशी घणाघाती टीका नाईक यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले, बिनविरोध निवडणुका या दहा लाख ते पन्नास लाख पर्यंतच्या बोली लावून उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यायला लावून केलेले आहेत. आमच्या लढणाऱ्या उमेदवारांनाही पैशाची ऑफर केली गेली परंतु त्यांनी ती नाकारली आहे. खऱ्या अर्थाने लोकशाहीचे ते हिरो आहेत. जनतेने त्यांना न्याय दिला पाहिजे. लोकशाही वाचवायची असेल तर या लोकशाही मानणाऱ्या उमेदवारांना जनतेने मतदान केले पाहिजे. जे बिनविरोध निवडून आले आहेत त्यांना जनतेच्या समस्या काय करणार आहेत. एसीत बसून ते सत्ता भोगणारे आहेत. विरोधी पक्षातील उमेदवारांना निधी देणार नाही.अशी पालकमंत्री धमकी देतात, तुम्ही तुमच्या घरातील निधी देणार आहात का? असा सवाल करीत जनतेने त्यांच्या या धमकीला भीक घालू नये. असे आवाहन त्यांनी केले.












