पावशीत भारतीय चर्मकार समाज संघटनेतर्फे जयंती सोहळा उत्साहात साजरा
कुडाळ (प्रतिनिधी) : “संत रोहिदास महाराजांचा आदर्श प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे. त्यांची विचारधारा समाजात पोहोचवली पाहिजे,” असे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाजचे राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी रविवारी पावशी येथे संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या जयंतीदिनी केले. भारतीय चर्मकार समाज संघटनेच्या वतीने संत शिरोमणी रवीदास महाराज यांची जयंती पावशी येथे समाजाचे पदाधिकारी बाबल पावसकर यांच्या निवासस्थानी भारतीय चर्मकार समाज संघटनेच्या वतीने संत शिरोमणी रवीदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाबल पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सहदेव चव्हाण, कोकण युवा अध्यक्ष भारत पेंडुरकर, महिला जिल्हाध्यक्ष मानसी चव्हाण, महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा चव्हाण, महिला मालवण तालुकाध्यक्ष साक्षी चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश चव्हाण, ज्येष्ठ सल्लागार रमेश कुडाळकर, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ चव्हाण, जिल्हा सहसचिव अंकुश चव्हाण, कुडाळ तालुकाध्यक्ष नंदकिशोर तेंडोलकर. कुडाळ उपाध्यक्ष बॉबी पावसकर उपस्थित होते.
राज्य अध्यक्ष चव्हाण म्हणाले, “आपला समाज न्याय्य प्रश्नांसाठी संघटितरीत्या एका छत्राखाली येणे आवश्यक आहे. आज आपला समाज मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. समाजासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजना तळागाळात पोहोचण्यासाठी काम केले पाहिजे. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. विशेष म्हणजे संत रोहिदास महाराजांचे आदर्श विचार सोबत घेऊन आपण तळागाळात पोहोचलो पाहिजे. युवापिढी या समाज चळवळीत मोठ्या प्रमाणात उतरली पाहिजे.”












