जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देश
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याने प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याची परंपरा जपली आहे. हीच परंपरा कायम राखत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत गेल्यावेळच्या तुलनेत किमान ५ टक्के अधिक मतदान होईल, यादृष्टीने सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी निवडणूक कामकाजाबाबत सूक्ष्म सूचना दिल्या. मतदान केंद्रांवरील सर्व आवश्यक कामे ६ तारखेपर्यंतच पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी केंद्रांवर किमान २४ तास आधी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे बंधन त्यांनी घातले आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात तीन याप्रमाणे जिल्ह्यात सर्वच ठिकाणी ‘आदर्श मतदान केंद्रे’ उभारली जावीत, ज्यामुळे मतदारांचा उत्साह वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.
तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सीसीटीव्हीचे मेगापिक्सल तपासून घ्यावेत आणि वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी यूपीएस व जनरेटरची सज्जता ठेवावी. निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी तंत्रस्नेही लोकांची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. टपाली मतदानाबाबत स्पष्ट सूचना देताना त्यांनी सांगितले की, पोस्टल मत मोजणीचे प्रशिक्षण व्यवस्थित घ्यावे आणि सर्व टपाली मतांची मोजणी पूर्ण झाल्याशिवाय निकाल घोषित करू नये. मतमोजणीची प्रक्रिया जलद करण्यासाठी अतिरिक्त टेबलची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी व उपजिल्हाधिकारी संपत खिलारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.












