वाहतूक पोलिसांनी द्यावे लक्ष ; अन्यथा जनआंदोलन – अजित नाडकर्णी
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठ रस्ता रुंदीकरण होऊनही वाहतूक कोंडी चा त्रास कमी झाला नसून बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करावी. वाहतूक पोलीसांनी बाजारपेठ वाहतूक कोंडीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी दिला आहे.करूळ – गगनबावडा घाटरस्त्याची दुरावस्था झाली असून कोल्हापूर ला जाणारी बहुतांश वाहतूक ही व्हाया फोंडाघाट मार्गे सुरू आहे.खाजगी वाहनचालक सुरक्षित रस्ता म्हणून फोंडाघाट मार्गे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग दरम्यान प्रवास करण्याला प्राधान्य देतात.मात्र फोंडाघाट बाजारपेठेत बेशिस्त कायम वाहतूक कोंडी होत आहे. काही खाजगी कारचालक तर रस्त्यावर आपले वाहन उभे करून तासनतास गायब होतात.त्याचा परिणाम वाहतूक कोंडी होण्यात होतो.याचा फटका अन्य वाहनांना बसतो.जिल्हा वाहतूक शाखेचे हवालदार तसेच पोलीस कर्मचारी कणकवली फोंडाघाट रस्त्यावर नांदगाव तिठा येथे उभे राहून आणि हायवे टॅब चे पोलीस हवालदार व कर्मचारी फोंडाघाट रस्त्याच्या पायथ्याशी उभे राहून वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करतात. या दोन्ही ठिकाण चे अंतर हे फोंडाघाट बाजारपेठ पासून फक्त अडीच ते तीन किमी. आहे.यातीलच एक पोलीस कर्मचारी जर फोंडाघाट बाजारपेठ मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नियुक्त केला तर वाहतुक कोंडी चा त्रास होणार नाही. फोंडाघाट पोलीस दुरक्षेत्रात केवळ दोन कर्मचारी नियुक्त असल्यामुळे त्यांना नियमित कामकाजाच्या व्यापामुळे बाजारपेठेतील वाहतूक कोंडी कडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही.तरी सिंधदुर्ग जिल्हा वाहतूक शाखा आणि हायवे टॅब च्या पोलीस अधिकाऱ्यांनी फोंडाघाट बाजरपेठेमधील वाहतूक कोंडीकडे लक्ष द्यावे अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा अजित नाडकर्णी यांनी दिला आहे.













