खांबाळे बौद्ध विकास मंडळ मुंबईचा कौटुंबिक स्नेहमेळावा संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी) : सध्याच्या धावपळीच्या युगात कुटूंबाला वेळ देणे अवघड होत आहे. अशा परिस्थितीत स्नेहसंमेलनानिमित्त संपूर्ण समाजाला एकत्र करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. यानिमित्त जुन्या-नव्या पिढींच्या विचारांची देवाण-घेवाण होते. त्यामुळे असे संमेलन होणे गरजेचे आहे. अशा संमेलनातून कुटूंबाबरोबरच समाज जोडला जात आहे. यातून एक चांगला समाज निर्माण होण्यास मदत होते. समाजोन्नत्तीचे हे काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अनेक मान्यवरांनी केले.
खांबाळे बौद्ध विकास मंडळ मुंबई/ग्रामीण यांचे वतीने कौटुंबिक स्नेहमेळावा 2023 बंध नात्यांचा… संकल्प विधायक कार्याचा २४ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई येथे फुलपाखरू गार्डन येथे मोठया उत्साहात संपन्न झाला.मुंबई शाखेचे अध्यक्ष कृष्णा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली या स्नेहमेळाव्याला सुरुवात करण्यात आली. तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सुरुवातीला खांबाळे बौद्ध विकास मंडळाने तीन पिढीतील व्यक्तीना एकत्र करून हा कौटुंबिक सोहळा आयोजित केला त्याबाबत विस्तृतपणे माहिती देण्यात आली.यानिमित्ताने बहुसंख्येने उपस्थित असलेल्या कुटुंबियांना शाल,संविधान उद्देशिका प्रत, गुलाबापुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येऊन थोडक्यात अल्पपरिचय घेण्यात आला. यावेळी तेजस कांबळे,स्वप्नाली कांबळे,निखिल कांबळे या युवा वर्गाने थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करून आजच्या तरूणाई पुढे असणारी आव्हाने आणि त्यात मुलांनी करीअर निवडताना घ्यायची काळजी या बाबत सविस्तरपणे मांडणी केली.
त्यांनतर खांबाळे बौद्धवाडीतील ध्येय धोरणांच्या संकल्पनांची मांडणी करणे या विषयावर खुले चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली. यामध्ये उपस्थित असलेल्यानी आपली मते व्यक्त केली. या खुल्या चर्चेत सहभाग घेतला. सध्याच्या धावपळीच्या युगात जीवन जगत असताना मुंबई सारख्या मोठया शहरात भावकीतील बांधव हे विखुरलेले असतात. त्याना खऱ्या अर्थाने एकत्र करून अशा प्रकारचे मेळावे व उपक्रम होणे गरजेचे आहे. जेणेकरून भावकी एकसंघ व एकजुटीने राहिल्यास विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून नव्या पिढीला आदर्शवत कामगिरी करता येईल असे मत अनेकांनी व्यक्त केले. या निमित्ताने सर्वांच्या चेहऱ्यावर या स्नेह मेळाव्यात सहभागी झाल्याचा विशेष आनंद पहायला मिळाला.
सुनील गुणाजी कांबळे,राजू सखाराम कांबळे, ललित धोंडू जाधव हे बृहन्मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झाले त्याबद्दल मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.खुल्या चर्चेत सहभाग घेऊन मंडळाच्या भविष्यातील वाटचाल विविध उपक्रमांसह कशी करता येईल यावर अनेकांनी आपले मते व्यक्त केली. बहुसंख्येने उपस्थित असलेल्या धम्म बांधव-भगिनी, युवा वर्ग यांच्या चेहऱ्यावर मेळाव्याच्या निमित्ताने समाधान व्यक्त केले.व अशाच प्रकारे कौटुंबिक स्नेह मेळावा किमान वर्षातून एकदा घेण्यात यावा अशी भावना व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,सुनील गुणाजी कांबळे, हरिश्चंद्र जाधव,रोहन कांबळे,प्रदीप कांबळे,राहुल कांबळे,तुषार कांबळे,विशाल कांबळे,नितेश जाधव,अविनाश कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली. गावावरून ह्या कार्यक्रमासाठी दीपक कृष्णा कांबळे,अभिषेक कांबळे,रोहित कांबळे हे उपस्थित होते. सुत्रसंचलन मुंबई शाखेचे सहसचिव हरिश्चंद्र जाधव यांनी केले तर प्रास्ताविक ग्रामीण सरचिटणीस रुपेश कांबळे यांनी केले,तर आभार मुंबई सरचिटणीस महेंद्र खांबाळेकर यांनी मानले.













