भालचंद्र कासले मूळ चिंदर गावचे रहिवासी
आचरा (प्रतिनिधी) : सुरक्षारक्षक आपली नियमित कामगिरी सांभाळत असताना समाजसेवी वृत्ती दाखवून इतरांनाही मदत करतात. या बाबीचा विचार करत घणसोली येथे वास्तव्यास असलेले(मूळ चिंदर-मालवणचे) भालचंद्र कासले यांना कोपरखैरणे येथे 17 डिसेंबर रोजी झालेल्या एका कार्यक्रमात सन्मानित करून प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह बहाल करण्यात आले. यावेळी कासलेंसोबत राज्यातील इतर सुरक्षारक्षकांचादेखील सन्मान करण्यात आला.
कोपरखैरणे येथील मनपा शाळा क्रमांक ३१ मध्ये ‘सुरक्षारक्षक गौरव सोहळा २०२३’चे आयोजन प्रवीण विटेकर, सहआयोजक संतोष खामकर, दीपक चाळके यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी भालचंद्र कासले यांनी समाजसेवेमध्ये उत्कृष्ट सहभाग दर्शवल्याबदल त्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके, सचिव गौरव नालिदे, कामगार प्रतिनिधी चंद्रकांत बोबडे, हणमंत सुरवसे, अशोक पाटील, लक्ष्मणराव भोसले, अजिंक्य भोसले, अशोक कळसकर, मकरंद हुमणे आदी उपस्थित होते.
सुरक्षारक्षक कामावर कर्तव्यदक्ष असताना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे म्हणजे कंपनीमधील मालमत्तेची चोरी करतेवेळी चोराला पकडणे, कंपनीमधील जीविताचे प्रसंगावधान राखत रक्षण केले असेल व ज्या सुरक्षारक्षकांना समाजसेवा, कलागुण, कौशल्य, विविध खेळामध्ये पारितोषिक मिळाली असतील, अशा सुरक्षारक्षकांचा गुणगौरव सोहळा या माध्यमातून केला जातो. त्यात भालचंद्र कासले यांचा सन्मान करण्यात आल्याने या भागातून त्यांचे कौतुक होत आहे.










