दोडामार्ग (प्रतिनिधी) : ड्रग्स फ्री सिंधुदुर्ग करण्यासाठी प्रहरी क्लबचे विद्यार्थी सज्ज असावेत असे आवाहन नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग च्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी केले.नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग, जि. प. माध्यमिक शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, व्यसनमुक्ती सल्ला केंद्र गोपुरी आश्रम वागदे, ता. कणकवली यांच्या वतीने आयोजित नशा मुक्त भारत अभियानांतर्गत दोडामार्ग तालुक्यातील हायस्कूलच्या प्रहरी क्लब प्रशिक्षणादरम्यान नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर बोलत होत्या. पुढे म्हणाल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही बालके आणि मुलांचा सहभाग अत्यंत प्रेरणादायी होता त्याप्रमाणेच आता आपल्या देशाला प्रहरी क्लबचे विद्यार्थी व्यसनापासून स्वातंत्र्य मिळवून देतील याची खात्री वाटते. प्रहरी क्लब मधील विद्यार्थी नशेच्या विरोधात लढा उभारतील. *प्रहरी क्लब म्हणजे पहारा देणारा किंवा सतर्क राहणारा समूह होय.
व्यसनांच्या पदार्थांपासून सतर्क राहून व इतरांना सतर्क करण्यासाठी या क्लबची स्थापना मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेत जिल्ह्यातील प्रत्येक हायस्कूलच्या प्रहरी क्लबचा सहभाग असावा. या क्लबच्या माध्यमातून आपली प्रशाला व आपल्या गावाचा परिसर नशा मुक्त राहावा यासाठी जनजागृतीचे नियोजन करावे. प्रत्येक प्रहरी क्लबचा व्यसनांच्या विरोधात जनजागृती करण्याचा कार्यकाल जून ते फेब्रुवारी असेल या कालावधीत उत्कृष्ट व्यसनांच्या विरोधात जनजागृतीचे कार्य करणाऱ्या प्रहरी क्लबला पारितोषक देऊन सन्मानित करण्यात येईल असे आवाहन अर्पिता मुंबरकर यांनी केले. या प्रशिक्षणासाठी हळवे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष सावंत, प्रा.प्रज्ञाकुमार गाथाडे प्रा.जाधव आणि माध्यमिक विद्यालय मांगेलीचे मुख्याध्यापक पुंडलिक पाटील, किर्ती विद्यालय घोडगेवाडीचे मुख्याध्यापक सखाराम कांबळे, शिक्षिका चेतना पटकारे, शिक्षक प्रवीण केसरकर, महेंद्र खांडेकर, राजाराम फर्जंद या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.प्रज्ञाकुमार गाथाडे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात कलम ४७चे वाचन करून करण्यात आली. समारोप व्यसनमुक्तीचा संकल्प घेऊन करण्यात आला.












