सभापती अनुराधा नारकरांच्या पवित्र्याने बालकांप्रति दक्षता अधोरेखित
कुडाळ (प्रतिनिधी) : महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी अंगणवाडी केंद्रांना पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याच्या गोदामाची अचानक पाहणी करून धान्य साठ्याची व व्यवस्थेची तपासणी केली.
या पाहणीदरम्यान गोदामातील बंदिस्त धान्याची पाकिटे उघडून दर्जाची तपासणी करण्यात आली. तसेच धान्याचा साठा, त्याची मांडणी, स्वच्छता व संबंधित सर्व रजिस्टर आणि नोंदींची पाहणी करण्यात आली. यावेळी गोदामातील धान्यसाठा व्यवस्थित व सुव्यवस्थित असल्याचे आढळून आले.
अंगणवाडी केंद्रांतील बालकांना पोषण आहाराचा पुरवठा वेळेत व सुरळीतपणे मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने, गोदामातील धान्याचा पुरवठा नियोजित वेळेत सर्व अंगणवाडी केंद्रांपर्यंत पोहोचविण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना सभापती अनुराधा नारकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच धान्याच्या साठवणुकीबाबत स्वच्छता, नोंदींचे नियमित अद्ययावतीकरण आणि पुरवठा व्यवस्थेत कोणतीही दिरंगाई होणार नाही याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
या पाहणीवेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, पंचायत समिती कुडाळचे सभापती मिलिंद नाईक तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) प्रतीक उगारे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अंगणवाडीतील बालकांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत व योग्य पद्धतीने मिळावा, यासाठी अशा प्रकारच्या नियमित तपासण्या व प्रत्यक्ष पाहणी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.











