शासनाचे उपक्रम , योजनांची चित्रफितीद्वारे नागरीकांना माहिती
चौके (अमोल गोसावी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून काढण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे मालवण तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायत येथे गुरुवारी आगमन झाले. या यात्रेचे गोळवण सरपंच सुभाष लाड यांच्या नेतृत्वाखाली गावातील बहुसंख्य नागरीकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी कृषी अधिकारी संजय गोसावी यांनी पुरोहिताच्या उपस्थितीत या यात्रेच्या रथाचे पूजन करून विविध योजनांचा शुभारंभ केला.
यावेळी कृषी अधिकारी संजय गोसावी यांच्यासह सरपंच सुभाष लाड उपसरपंच शरद मांजरेकर, आरोग्य विस्तार अधिकारी सुरज बांगर, मुख्यसेविका स्नेहल गावडे, मुख्याध्यापक संतोष पाताडे, ग्रामसेविका अर्पिता शेलटकर, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा तेली, विरेश पवार, साबाजी गावडे, आरोग्य विभागाचे डॉ. संदीप साळकर, प्रकाश चिरमुले, नंदादीप नाईक, विविध विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी रथावरील स्क्रीनवर चित्रफितीद्वारे विविध योजनाची माहिती नागरिकांना देण्यात आली. यामध्ये केंद्र शासनाच्या उज्वला गॅस योजना, आयुषमान भारत, कृषी विषयक अनुदान योजना, आदी विविध लोकाभिमुख योजनाची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामपंचायत गोळवण कार्यालयात आयुषमान भारत योजना, उज्वला गॅस योजना, आधारकार्ड लिंक व दुरुस्ती, आरोग्य तपासणी आदीचे कॅम्प लावण्यात आले होते, याचा गोळवण- कुमामे – डिकवल मधील सुमारे ३०० नागरिकांनी लाभ घेतला.
यावेळी सरपंच सुभाष लाड म्हणाले, शासनाच्या विविध योजना आपल्या गावातील सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा पोहचतील व त्यांना योजनांचा लाभ कसा मिळेल, मिळेल या उद्देशाने आपण ग्रामपंचायतीच्या वतीने नेहमीच लोकाभिमुख योजनाचे कार्यक्रम राबविले आहेत त्याला नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. यावेळी आरोग्य विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग, आधारकार्ड नूतनीकरण तसेच विविध विषयावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना माहिती देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित राहिलेले गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर यांनीही योजनाची माहिती देऊन गोळवण ग्रामपंचायतीच्या वतीने विविध योजनांच्या होणाऱ्या अंमलबजावणी बाबत समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन सुभाष लाड यांनी केले. तर आभार माजी उपसरपंच साबाजी गावडे यांनी मानले.












