अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : मिठबाव येथील प्रसाद परशुराम लोके याचा मुणगे मशवी रोडवर खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी किशोर परशुराम पवार ( रा कुंभारमाठ, मालवण ) याचा जामीन अर्ज जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्री. एच.बी.गायकवाड यांनी फेटाळला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी जामीन नामंजूर होण्यासाठी आरोपी किशोर पवार च्या वकिलांचा युक्तिवाद खोडून काढल्यामुळे आरोपी किशोर पवार चा जेलमुक्काम वाढला आहे. किशोर पवार याने 18 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास प्रसाद लोके याचा मशवी येथे खून केल्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा यशस्वी तपास देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी केला होता. आरोपी पवारच्या जामीन अर्जाला जोरदार हरकत घेत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी पुढील मुद्दे न्यायालयासमोर मांडले. खुनाच्या गुन्ह्यात अन्य साथीदार असल्यास तपास करायचा आहे, गुन्हा करताना आरोपीने वापरलेला मोबाईल हस्तगत करणे आवश्यक असून त्याला जामीन मिळाल्यास सदर मोबाईल व पुरावा तो नष्ट करू शकतो, खुनाच्या गुन्ह्यात आरोपी चा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट असून त्यादृष्टीने अधिक पुरावा गोळा करणे, आरोपी किशोर पवार ला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, आरोपीने थंड डोक्याने मयत प्रसाद लोके चा निर्घृण खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, आरोपीला जामीन मिळाल्यास मयत प्रसाद लोकेचे वडील व कुटुंबियांच्या जीवाला धोका पोचवू शकतो. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. गायकवाड यांनी आरोपी किशोर पवार चा जामीन अर्ज फेटाळून लावला.