स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्षात साता-यातील कातकरी मजूरांची वेठबिगारीच्या गुलामीतून मुक्ती

श्रमजीवी संघटनेच्या लढवय्या शिलेदारांची उल्लेखनीय कामगीरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारत देश स्वतंत्र झाल्याच्या घटनेला ७६ वर्षे पुर्ण झाली असून सद्या स्वातंत्र्याचे ७७ वे वर्ष सुरू आहे भारतीय संविधानानुसार देशाचा लोकशाही कारभार सुरू झाल्याला येत्या २६ जानेवारी,२०२४ ला ७४ वर्षे पुर्ण होतील. आणि भारतीय लोकशाही व्यवस्थेचे अमृतमहोत्सवी वर्ष होईल.असे सर्व असले तरी महाराष्ट्र राज्यातील हजारो आदिवासी कातकरींचे वेठबिगारीच्या गुलामीतील यातनामय जीवन पाहिल्यानंतर बंडखोर कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी देशाच्या शासन व्यवस्थेला कवितेतून विचारलेला प्रश्न आजही किती समर्पक आहे.हे दिसून येते.

कवि पाडगावकर म्हणतात “जमाखर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा उंच प्रासादांचा जाब मागणार केव्हा, घाम ओतुनी जो पिकवी मळे अमृताचे दिवा झोपडीतुन त्याच्या लागणार केव्हा”राज्यातील उंचउंच प्रासाद उभारण्यासाठी मुलभूत काम करणा-या हजारो आदिवासी कातकरींचे जीवन आजही वेठबिगारीच्या शृंखलेत अडकलेले आहे हे श्रमजीवी संघटना महाराष्ट्रच्या लढवय्या शिलेदारांनी आज दि.८ जानेवारी,२०२४ रोजी सातारा जिल्ह्यात वेठबिगारीतून मुक्त केलेल्या कातकरी मजूरांच्या यातनामय जीवन परिस्थीतीमधून समोर येत आहे.

श्रमजीवी संघटना महाराष्ट्रचे संस्थापक व महाराष्ट्र राज्य आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित व त्यांच्या पत्नी विद्युल्लता पंडित यांनी त्यांचे सारे जीवन आदिवासी श्रमजीवी मजूरांना वेठबिगारीच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी व्यतीत केले.त्यांच्याच मार्गदर्शनातून तयार झालेल्या सिता घाटाळ,आजित गायकवाड,संतोष धिंडा,अंकुश वड, रविंद्र वाघ, ईश्वर बांबरे या कार्यकर्त्यांच्या टिमने आज सातारा तालुका कोरेगाव येथे जावून प्रत्यक्ष परिस्थीती पाहिली. २५ आदिवासी कातकरी मजूर व बालके यांना वेठबिगारीतून मुक्त केले.कोरेगाव येथील ठेकेदार तेजस यादव व नामदेव खरात यांनी मजूरांना सहा दिवस डांबून ठेवून मारहाण केली होती.कोरेगावचे तहसिलदार कोडे साहेब व कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक बिराजदार साहेब यांचेसह कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जावून मजूरांची मुक्तता केली.

error: Content is protected !!