राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत समीर चांदरकर जिल्ह्यात प्रथम

चौके (अमोल गोसावी) : राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३ – २४ या स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे कलाशिक्षक श्री समीर अशोक चांदरकर यांनी जिल्हास्तरावर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३ – २४ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे कलाशिक्षक समीर अशोक चांदरकर यांनी जिल्हास्तरावर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. शाळेला सुट्टी शिकू नव्या गोष्टी, या शीर्षकांतर्गत त्यांनी मुलांना मिळणाऱ्या शालेय सुट्टीचा उपयोग करत विविध कलाविषयक उपक्रमांचे आयोजन केले. यात शालेय भिंती बोलक्या करणे, बस स्थानकावरील भिंतीवर सामाजिक संदेश देणारी चित्र रेखाटणे , चित्र प्रदर्शन, माती पासून विविध वस्तू बनवणे अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले. त्यांच्या या यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर व शेखर पेणकर , सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, वराडकर हायस्कूल कट्टा चे मुख्याध्यापक संजय नाईक यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!