लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम फोंडाघाटची शिक्षक- विद्यार्थी क्षेत्रभेट सहल उत्साहात संपन्न !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता केवळ पुस्तकी अथवा शालेय ज्ञान उपयोगी पडत नाही. तर विविध व्यवसाय, ऐतिहासिक, सांस्कृतिक, अन वारसा लाभलेल्या स्थळांना भेट देऊन, त्याची अभ्यासपूर्ण माहिती मुलांना प्रगल्भ आणि व्यावहारिक बनवते.जगात कसं वागावे ? आणि कसं जगाव ? याचं बाळकडू या फिल्ड व्हिजिट मधून त्यांना मिळते. बालवयातील हा संस्कार त्यांच्या भावी आयुष्यात चिरकाल टिकणार असतो. त्यामुळे आयोजक शिक्षक आणि चिमुकल्यांचे मनस्वी कौतुक ! अशा शब्दात अभिनव उद्योग प्रबोधिनीचे कुडाळचे श्री. पार्सेकर यांनी गौरव केला.
फोंडाघाट लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल ची इयत्ता तिसरी ते पाचवी ची फील्ड व्हिजीट ( क्षेत्रभेट ) नुकतीच पार पडली. कुडाळ एमआयडीसी मधील अभिनव उद्योग प्रबोधिनीचे श्री. पार्सेकर यांनी मुलांना त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि उत्पादित मालाबद्दल माहिती सांगितली. आणि त्यांचा उत्साह वाढवला. माऊली ऍग्रो प्रॉडक्ट्सच्या प्रकाश सावंत यांनी फॅक्टरीत तयार होणाऱ्या पदार्थांची- मशिनरींची आणि विक्री पद्धतीची सोप्या शब्दात माहिती सांगितली. आणि मुलांचे शंका समाधान केले. राणे मिल्क प्रॉडक्ट फॅक्टरीमध्ये आईस्क्रीम ची जन्मकथा मुलांनी जाणून घेतली.
त्यानंतर मालवण मध्ये जीर्णोद्धार झालेल्या राजकोट किल्ल्याला भेट देऊन, उभारलेल्या भव्य शिवरायांच्या पुतळ्याला सर्वांनी अभिवादन केले. मुलांनी तर स्फुरण चढलेल्या मावळ्याप्रमाणे महाराजांचा जयजयकार समुद्राच्या उदंड लाटांच्या गजरात केला. त्यावेळी ऐतिहासिक आणि आरमाराची माहिती समजून घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष मासेमारी नंतर होणारा लिलाव भेट देऊन मच्छीमार बंधू-भगिनी कडून त्यांच्या व्यवसायाची माहिती करून घेतली .मच्छीमारांचे कौतुकही मिळवले.यादरम्यान मुलांचे कौतुक करताना कुडाळ येथील सा.बा.पाटकर यांनी कोकणचे आदरतित्थ्य राखताना मुलांना मोफत नाश्त्याची व्यवस्था केली. यावेळी प्र.प्राचार्य विनया लिंग्रस ,सहाय्यक शिक्षिका करुणा चिंदरकर,गौरी गावकर,नीलाक्षी चव्हाण, रिया भिसे, श्वेता शिंदे, मदतनीस उर्मिला कुशे ,पाटकर, पारकर, सावंत यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली आणि मुलांना आनंद दिला…..












