असलदे पोलिस पाटील सावित्री पाताडे यांनी रंगेहाथ पकडून केले पोलिसांच्या हवाली
नांदगाव (प्रतिनिधी) : असलदे गावठण येथील चव्हाट्यावर तीन महिलांना लोखंडी साहित्य चोरी करताना पोलिस पाटील सावित्री पाताडे यांनी रंगेहाथ पकडले.हि माहीती मिळताच संपूर्ण गावकरी जमा होऊन कणकवली पोलिसांना माहिती दिली.हि घटना सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,आज सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास असलदे पोलिस पाटील सावित्री पाताडे या असलदे चव्हाट्याजवळून जात असताना तीन महिला चव्हाटा परिसरात संशयास्पद वावरताना दिसल्या.म्हणून पुढे जाऊन विचारपूस केली असता त्यांनी येथील लोखंडी साहित्य चोरी केल्याचे लक्षात आले.त्यामुळे त्यांना रोखून धरत ग्रामस्थांना माहीती देताच संपुर्ण गाव जमा झाला.अधिक चौकशी केली असता चोरलेले लोखंडी साहित्य जवळच्या झाडीत लपवून ठेवल्याचे कबूल केले.यानंतर कणकवली पोलिस स्थानकात माहिती देण्यात आली.
घर परड्यात माणसांची जाग नसल्याचे पाहून लोखंडी किंवा इतर साहित्य चोरून पसार होतात.अशा लोकांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे असे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.यावेळी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब, पोलिस पाटील सावित्री पाताडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संशयित महिलांचा अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.