ओरोस (प्रतिनिधी) : पीडित दिव्यांग महिलेवर बलात्कार करून तिचा गर्भपात केल्याच्या गुन्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूर गावातील 60 वर्षीय आरोपी रमेश दत्ताराम असगणकर याचा जामीन जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश एच.बी. गायकवाड यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. दिव्यांग पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार रमेश असगणकर याने पीडितेवर बळजबरी करून बलात्कार केला. यातून पीडित महिला गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला. आरोपी रमेश याला कुडाळ पोलिसांनी अटक केल्यानंतर सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. जामिनावर मुक्तता व्हावी यासाठी आरोपी रमेश याने दाखल केलेल्या अर्जाला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.पीडिटेवर जबरदस्तीने वारंवार बलात्कार करून ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने स्वतः नातेवाईक असल्याचे सांगत तिचा गर्भपात केला आहे, पीडिता दिव्यांग असून तिला कामावरून काढण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आहे, आरोपीला जामीन मिळाल्यास तो फिर्यादिवर दबाव आणू शकतो, साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात गैरहजर राहण्याची शक्यता आहे. सरकारी वकील देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश गायकवाड यांनी आरोपी रमेश असगणकर याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी रमेश असगणकर चा जामीन नामंजूर












