तळेरे येथे मराठी राजभाषा गौरव दिन साजरा : अक्षरोत्सव प्रदर्शनाचे आयोजन
तळेरे (प्रतिनिधी) : कविता ठरवून करण्याची अथवा मिरवण्याची गोष्ट नाही. खोटं केलं तर ती तुमच्यावर सुड उगवते. कविता अवतरली पाहिजे. कवी व्याकूळ होत असतो असे सांगतानाच माझ्या कवितेचा विषय माणूस आहे म्हणून मी कवी आहे, असे प्रतिपादन नामवंत कवी डॉ. अनिल धाकू कांबळी यांनी तळेरे येथे केले.
तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, वाचनालय आणि वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अनिल धाकू कांबळी यांच्या हस्ते दीपप्ज्वलनाने आणि विनय पावसकर यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उप सरपंच शैलेश सुर्वे, माजी पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर, संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर, सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, उपाध्यक्ष राजू वळंजू, सचिव मिनेश तळेकर, माजी सरपंच शशांक तळेकर, प्रवीण वरुणकर, शरद वायंगणकर, बी. पी. साळीस्तेकर, अक्षय मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.