38 लाख 43 हजारांच्या अवैध दारुसह 53 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्ग एलसीबी ची जबरदस्त कामगिरी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ही निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी याकरीता जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी इंत्यभूत माहिती संकलित करुन त्यांचेविरुध्द परिणामकारक कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व कृषिकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी सर्व पोलीस ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत.

त्या अनुषंगाने अवैध धंदे करणा-यांविरुध्द कडक कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. सदर पथकास दि. 4 मार्च रोजी आयशर टेम्पो क्रमांक MH-07-AJ-6059 मधून गोवा बनावटीचे दारुची गोवा-मुंबई हायवेने वाहतूक होणार असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली होती. सदरची माहिती सचिन हंदळेकर, पोलीस निरीक्षक यांना सांगून त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे महेंद्र घाग, सहा. पोलीस निरीक्षक यांचे नेतृत्वाखाली गोवा ते मुंबई जाणारे महामार्गावर ओरोस, खर्येवाडी येथे सापळा रचून थांबलेले असताना, सकाळी 10:35 वाजताचे दरम्याने आयशर टेम्पो क्र. MH-07-AJ-6059 हा गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. सदरचा टेम्पो थांबवून चालक व टेम्पोचे हौद्यामधील मालाची खात्री केली असता टेम्पोमध्ये गोवा बनावटीच्या दारुने भरलेले 828 पुठ्याचे बॉक्स, त्यामध्ये 38,43,600/- रुपये (अडतीस लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये) किंमतीची गोवा बनावटीची दारु व 15,00,000/- रुपये किंमतीचा टेम्पो असा मिळून एकूण 53,43,600/- रुपये (त्रेपन्न लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये) किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

सदर टेम्पोवरील चालक हा आपले ताब्यातील आयशर टेम्पो क्र. MH-07-AJ-6059 मधून बिगर परवाना गोवा बनावटीची दारु वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्याचे विरुध्द सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे गु.र.नं. 19/2024, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65(अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्ह्याचा पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणेकडून करण्यात येत आहे.

सदरची कारवाई सचिन हुंदळेकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे महेंद्र घाग, सहाय्यक . पोलीस निरीक्षक, रामचंद्र शेळके, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार लक्ष्मण साळुंके, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, बस्त्याव डिसोजा, अमित तेली, चंद्रकांत पालकर, जयेश सरमळकर, चंद्रहास नार्वेकर, यशवंत आरमारकर यांनी केलेली आहे.

error: Content is protected !!