‘फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये’, कोकणात राणे-कदम वाद पेटणार

ब्युरो न्यूज (सिंधुदुर्ग) : मोदी, शाहांमुळे भाजपात आलो, पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा असे म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यानंतर लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गट-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर रामदास कदमांना गांभीर्याने घेऊ नका, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दरम्यान आता भाजपचे मंत्री नारायण राणेंनी कदमांवर जोरदार प्रहार केलाय. आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे , त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? असा प्रश्न राणेंनी विचारला. जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल, असा टोला राणेंनी कदमांना लगावला. यामुळे कोकणात शिंदे गट विरुद्ध भाजप असा वाद पेटण्यावर आता शिक्कामोर्तब झालंय.

error: Content is protected !!