देवगड (प्रतिनिधी) : भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई , शाखा – देवगड च्या संयुक्त विद्यमाने संतशिरोमणी रविदास महाराज व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती मालपे, ता . देवगड येथे देवगड तालुका सल्लागार वसंत लक्ष्मण समजिसकर व महिला आघाडी देवगड तालुका उपाध्यक्षा वर्षा वसंत समजिसकर यांच्या निवासस्थानी समाज बांधव व संघटना पदाधिकारी यांचे उपस्थितीत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जिल्हा अध्यक्ष सी. आर. चव्हाण, जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव, राज्य कार्याध्यक्ष अनिल मारूती चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत देवरूखकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी देवगड तालुका अध्यक्ष सुरेश जाधव, सरचिटणीस बबन देवरूखकर, महिला आघाडी प्रमुख कल्पना प्रकाश चव्हाण व तालुक्यातील सर्व गावांचे समाज बांधव प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्य कार्याध्यक्ष अनिल चव्हाण यांनी समाजाला उद्बोधन पर मार्गदर्शन करताना सांगितले की समाजात ज्या अंधश्रद्धा, वाईट रुढी परंपरा सोडून दिल्या पाहिजेत. आपल्या समाजाने शिक्षणाबरोबर विज्ञानाची कास धरून सत्य – असत्याची पडताळणी करून समाज सुदृढ होण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले . त्याजबरोबर त्यांनी समाजात अंधश्रद्धा, भानामती, बुवाबाजी ‘ करणी वगैरे करून कसे फसविले जाते याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. समाज एकसंघ झाला तरच खऱ्या अर्थाने महामानव डॉ . बाबासाहेबांच्या संविधानाचा जीवनात उपयोग झाला व खऱ्या अर्थाने ते आपण अंगिकारले असे म्हणता येईल. यासाठी पायाभूत हक्क व अधिकार मिळवून आपल्या समाजाचा बौद्धीक, सामाजिक विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. आपण आपल्यातील किरकोळ मतभेद बाजूला ठेवून एकोप्याने राहणे ही काळाची गरज आहे. भविष्यात आरक्षणच संपुष्टात येईल. स्पर्धेच्या युगात टिकाव धरायचा असेल तर आपली मुले उच्चशिक्षित झालीच पाहीजेत असे प्रतिपादन संतोष जाधव यांनी केले.
संपूर्ण देवगड तालुक्यातील समाजबांधव जर एकत्र यायचे असतील तर त्यांना हक्काचे व्यासपीठ असायलाच हवे . यासाठी समाजभवनाची गरज असून संघटनेने यासाठी पाठपुरावा करून हे एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असा आशावाद मा. देवरूखकर गुरुजी यांनी व्यक्त केला. या उत्कृष्ट व नियोजनबद्द कार्यक्रमासाठी देवगड अध्यक्ष सुरेश पवार व सरचिटणीस बबन देवरूखकर सर, यशवंत देवरूखकर गुरुजी तसेच वसंत देवरूखकर, वर्षा देवरुखकर , कल्पना चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण साहेब यांनी फोन द्वारे शुभेच्छा संदेश दिला. प्रशांत धामापूरकर , भास्कर कोतावडेकर, गणेश समजिसकर , वामन शिरकर, रमेश शिरकर व अनिसकुमार चव्हाण (जिल्हा युवक सचिव) व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते .सूत्रसंचालन सुरेश जाधव यांनी केले. बबन देवरूखकर यांनी आभार व्यक्त केले.