दादा साईल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्र्यांचे मानले आभार
विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी विशेष प्रयत्न करणार
कुडाळ (प्रतिनिधी) : मागील अडीच वर्ष विकासात्मक निधीपासून कोसो दूर असलेल्या कुडाळ तालुक्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी खा. निलेश राणे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. यातून कुडाळ तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे. वेगवेगळ्या विकास कामात प्रत्येक हेडला प्राप्त निधीची सविस्तर माहिती प्रत्येक गावागावात जाऊन भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिली जाईल, असे भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
यावर्षी मंजूर झालेल्या विकास कामांमध्ये स्थानिक नागरिक आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात आलेल्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यानिमित्त भाजपाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, नगरसेवक गटनेते विलास कुडाळकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, नगरसेवक अभिषेक गावडे, निलेश परब, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक गणेश भोगटे, सोशल मीडिया युवा जिल्हा अध्यक्ष राजवीर पाटील, संजय परब आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळवर अन्याय होता कामा नये याची विशेष काळजी घेतली आणि याकामी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी काटेकोरपणे पालन करत विशेष सहकार्य केले. याबद्दल आपण या सर्व नेत्यांचे कुडाळ तालुक्याच्या वतीने जाहीर ऋण व्यक्त करतोच आणि येणाऱ्या काळात कुडाळ तालुक्यातील बहुतांशी कामे मार्गी लावण्यासाठी तसा पाठपुरावा करून कुठल्याही गावावर अन्याय होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल. यावर्षी मंजूर झालेल्या विकास कामांमध्ये स्थानिक नागरिक आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात आलेल्या कामांना मंजुरी मिळाली आहे, हे या जिल्हा नियोजन समितीचे वैशिष्ट्य आहे. मागच्या काही कालावधीत कॉन्ट्रॅक्टर आणि काँट्रॅक्टर लॉबीचे प्रमुख स्थानिक आमदार हेच विकास कामांची यादी अंतिम करत होते. परंतु यावेळी मात्र माजी खासदार निलेश राणे यांच्या सततच्या पाठपुरावाच्या आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची कामे मार्गी लागलेली आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.












