दहिबावमध्ये वृद्ध दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला; आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

देवगड (प्रतिनिधी) : दहिबाव-बावकरवाडी येथे गुरांच्या मालकीच्या वादातून तसेच गायचे दूध काढण्याच्या कारणावरून ८४ वर्षीय वृद्धासह त्याच्या ७० वर्षीय पत्नीवर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी देवगड पोलिसांनी अक्षय चंद्रकांत बावकर (वय ३२, रा. दहिबाव-बावकरवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत ७० वर्षीय आनंदी मधुकर बावकर यांनी देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११८(२), १३१, ३५१(२)(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे पती मधुकर रामजी बावकर हे घराजवळील देवघराच्या बाजूस गायीचे दूध काढत होते. त्यावेळी गुरांच्या मालकीच्या कारणावरून व गायचे दूध काढण्याच्या रागातून आरोपी अक्षय बावकर याने मधुकर बावकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच लाकडाने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.

पतीला सोडविण्यासाठी आनंदी बावकर पुढे गेल्या असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या डोक्यावर व डाव्या हाताच्या बोटांवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, हा प्रकार सुरू असताना आनंदी बावकर यांचा पुतण्या चंद्रकांत विठ्ठल बावकर हा मध्यस्थी करून सोडविण्यासाठी आला. त्यावेळी आरोपीने हातात कोयता घेऊन चंद्रकांत बावकर यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेत आनंदी बावकर व त्यांचे पती मधुकर बावकर हे दोघेही जखमी झाले आहेत. घटनेनंतर देवगड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत अटकेची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्याला देवगड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणाचा पुढील तपास देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

error: Content is protected !!