मोबाईलच्या दुनियेतही फोटोग्राफरांचेही अस्तित्व कायम – गोटया सावंत

कणकवलीत जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोग्राफी प्रदर्शन व स्पर्धा उत्साहात; स्पर्धेत विजेत्या फोटोग्राफरांना बक्षीस वितरण

कणकवली (प्रतिनिधी) : “आजच्या सोशल मीडियाच्या युगात मोबाईलमधून क्षणार्धात फोटो काढले जातात. मात्र, कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्राची आणि त्यामागील कलाकारीची मजाच वेगळी आहे. छायाचित्रे ही आयुष्यभराच्या आठवणी जपण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. फोटोग्राफर आणि पत्रकार हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे आमच्यासह अनेक समाजातील राजकीय , सामाजिक कार्यकर्ते घडले आहेत. कणकवली फोटोग्राफर असोसिएशनचे हे पहिले मोठे प्रदर्शन असून आगामी ५ ते १० वर्षांत या उपक्रमाची दखल जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रात घेतली जाईल. त्यामुळे मोबाईलच्या दुनियेतही फोटोग्राफरांचेही अस्तित्व कायम टिकुन राहिले असल्याचे प्रतिपादन,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा नाटळ जिल्हा परिषद सदस्य गोटया सावंत यांनी केले.

कणकवली येथील प.पु. भालचंद्र महाराज संस्थान सभागृहात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कणकवली फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने फोटोग्राफी प्रदर्शन व छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शन कार्यक्रमाचा शुभारंभ फित कापून व दीपप्रज्वलन गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कलमठ सरपंच संदीप मेस्त्री,कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, फोटोग्राफर असोस‌िएशनचे अध्यक्ष विनायक पारधिये, कलमठ माजी उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, सुरजित धवन , संजय राणे, नितीन कुवळेकर ,विनोद दळवी ,परेश कांबळी,कृष्णा कांबळी ,संतोष कांबळे,आनंद काळसेकर ,हेमंत काळसेकर, चेतन पवार ,योगेश्वर मोडक, गणेश लुडबे, योगेश चव्हाण, समर्थ कोळंबकर, संजोग सावंत, रविकिरण शिरवलकर , अनिकेत उचले, राजू सोहनी आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात विविध विषयांवरील दर्जेदार छायाचित्रे पाहण्याची संधी रसिकांना मिळाली. फोटोग्राफी क्षेत्रातील तरुण तसेच अनुभवी छायाचित्रकारांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत म्हणाले, आपल्या सार्वजनिक जीवनातील ३४ वर्षांच्या प्रवासात छायाचित्रकारांनी दिलेल्या योगदानाचा आहे. माझ्या चांगल्या तसेच वाईट प्रसंगांचे फोटो प्रसिद्ध झाले. या छायाचित्रांमुळे अनेक घटना समाजापर्यंत पोहोचल्या. छायाचित्रकारांनी कुठेतरी आम्हाला प्रसिद्धी मिळवून दिली आणि त्यामुळे आम्ही पुढे पोहोचलो. जुने फोटो अल्बम आणि आजच्या मोबाईल फोटोंमध्ये फरक आहे. कागदावर जतन केलेल्या छायाचित्रांकडे अनेक वर्षांनी पाहताना निर्माण होणारी आठवण आणि आनंद मोबाईलमध्ये साठवलेल्या छायाचित्रांपेक्षा वेगळा असतो.

संदीप मेस्त्री म्हणाले, लग्न, वाढदिवस अथवा इतर आनंदाच्या कार्यक्रमांमध्ये स्वतःच्या वेळेची पर्वा न करता आठवणी जतन करण्याचे काम फोटोग्राफर करतो. ब-याच दिवसांनी राजकीय कार्यक्रम सोडून एक चांगला कार्यक्रमाला उपस्थित राहता आले. फोटोग्राफर आणि पत्रकार यांच्यामुळेच राजकीय , सामाजिक जीवनात यशस्वी होवू शकलो. कणकवली परिसरातील अनेक छायाचित्रकार या उपक्रमात सहभागी झाल्याने हा कार्यक्रम आपल्यासाठी घरचा कार्यक्रम असल्याची भावना आहे.

कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके म्हणाले, समाजातील पत्रकार आणि फोटोग्राफर हे प्रमुख घटक आहेत. कारण फोटोग्राफर हा एखादा फोटो दिल्यानंतर त्यावरुन चांगली बातमी तयार करण्याची दृष्टी पत्रकाराला मिळते. समाजातील एखादी घटना दृश्य स्वरूपात लोकांसमोर आणण्याचे महत्त्वाचे काम छायाचित्रकार करतात. चांगल्या तसेच गंभीर घटनांचे वास्तव समाजापर्यंत पोहोचवण्यात छायाचित्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे फोटोग्राफर दिनाच्या निमित्ताने असोसिएनच्या उपक्रमांना शुभेच्छा आहेत.

प्रास्ताविक करताना पारधिये म्हणाले, १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा करण्यामागील इतिहास सांगितला. १९ ऑगस्ट १८३९ रोजी फ्रान्समध्ये फोटोग्राफी तंत्रज्ञानाशी संबंधित महत्त्वपूर्ण घोषणा झाल्यानंतर या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. दरवर्षी संघटनेच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला जातो. यंदा प्रदर्शन आणि स्पर्धेचे स्वरूप व्यापक करण्यात आले. ग्रामीण भागातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील फोटोग्राफरमधील वेडिंग फोटोग्राफीतील प्रतिभेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ छायाचित्रकार पराग शिंदे आणि विजय शेट्टी यांनी ऑनलाइन पद्धतीने केले. वेडींग फोटोग्राफर स्पर्धा प्रथम क्रमांक अवधूत लाड, द्वितीय क्रमांक विनायक पारधीये, तृतीय क्रमांकचेतन पवार उत्तेजनार्थ मनोज पारकर, उत्तेजनार्थ सागर पाटील यांना सन्मानचिन्ह , रोख रक्कम , प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाला फोटोग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ छायाचित्रकार, पत्रकार, कणकवली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण व अनुभवी फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!