पालकांच्या कष्टाचे चीज करा-प्रसन्ना उर्फ बाळू देसाई
वेंगुर्ला (प्रतिनिधी) : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत घेत दहावी व बारावीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाचा गौरव करण्यासाठी वेंगुर्ला एस.टी. आगारात गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टी व सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, वेंगुर्ला आगार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे वेंगुर्ला आगार अध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “आई-वडिलांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवा आणि आपल्या कर्तृत्वातून त्यांच्या कष्टाचे चीज करा,” असे आवाहन केले.
दिवसरात्र प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असतानाही एस.टी. कर्मचारी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या पाल्यांनी मिळवलेले यश हे विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच पालकांच्या त्यागाचेही फलित असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दहावी-बारावी हा शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असून, पुढील शिक्षणासाठी आवडीचे क्षेत्र निवडून योग्य नियोजन, शिस्त, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर पुढे जाण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला वाहतूक निरीक्षक तारी, सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा विभागीय सचिव भरत चव्हाण, आगार सचिव दाजी तळवणेकर यांच्यासह एस.टी. आगारातील कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे आगारात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.












