डांगमोडेच्या सुपुत्राचा मुंबई पोलीस दलात गौरव
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते कुटुंबासमवेत सत्कार
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील डांगमोडे गावचे सुपुत्र आणि बृहन्मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले दीपक अनंत ठाकूर यांच्या ३५ वर्षांच्या निष्कलंक व उल्लेखनीय पोलीस सेवेला दुहेरी सन्मान लाभला आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवाकार्याची दखल घेत राष्ट्रपती पदक (गुणवत्तापूर्ण सेवा) तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील पोलीस, कारागृह, अग्निशामक व होमगार्ड दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रपती पदक व सेवा पदकांची घोषणा १४ ऑगस्ट रोजी करण्यात आली. त्यामध्ये दीपक ठाकूर यांच्या नावाचा समावेश आहे.
एलएलबीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले दीपक ठाकूर सन १९९१ मध्ये मुंबई पोलीस दलात दाखल झाले. तब्बल ३५ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेचा आदर्श निर्माण केला. यापूर्वी त्यांनी जुहू, ओशिवरा आणि कांदिवली पोलीस ठाण्यांमध्ये उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेत २०१० मध्ये पोलीस महासंचालक पदकाने त्यांचा गौरव करण्यात आला होता.
दीपक ठाकूर यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेला मिळालेल्या या दुहेरी सन्मानाबद्दल १५ ऑगस्ट रोजी मुंबई पोलीस मुख्यालयात मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी ठाकूर यांचा कुटुंबीयांसमवेत सत्कार करून अभिनंदन केले.
डांगमोडे येथील राजेंद्र ठाकूर व नारायण ठाकूर यांचे ते बंधू आहेत. गावच्या सुपुत्राला मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे डांगमोडेसह मालवण तालुक्यातून दीपक ठाकूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













