आचरा (प्रतिनिधी) : ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणीचे माजी मुख्याध्यापक, विद्यार्थीप्रिय शिक्षक कै. प्रकाश पेडणेकर यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रासह वायंगणी परिसरावर शोककळा पसरली आहे. ज्ञानदीप संस्था, वायंगणीच्या वतीने कै. पेडणेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
“पेडणेकर सरांनी दिलेला शाब्दिक मार हा व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी उपयुक्त ठरला. त्यांनी केलेल्या ज्ञानदानातून ते कायमचे अजरामर राहतील,” असे भावपूर्ण उद्गार संस्थेच्या खजिनदार ॲड. समृद्धी आसोलकर यांनी काढले.
ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयासाठी शिक्षक म्हणून कै. पेडणेकर सरांनी दिलेले योगदान सदैव अविस्मरणीय राहील. त्यांची प्रदीर्घ कारकीर्द आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम कधीही विसरता येणार नाहीत. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे, अशा भावना संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी व्यक्त केल्या.
मुख्याध्यापक दगडूपंत टकले सर यांनीही कै. पेडणेकर सरांच्या निधनाने शिक्षकवृंदामध्ये दुःखाची भावना निर्माण झाल्याचे सांगत त्यांच्या कार्याला उजाळा दिला आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू, खजिनदार ऍड. समृद्धी आसोलकर, शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत हडकर, संस्था सदस्य दिपक सुर्वे, उदय दुःखंडे, अशोक सावंत, ग्रामस्थ, मुख्याध्यापक दगडूपंत टकले सर, शिक्षक प्रभा हळदणकर, वसावे, आडे, संजय जाधव, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी कै. प्रकाश पेडणेकर सरांच्या स्मृतींना अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.













