देवगड (प्रतिनिधी) : आंबा हंगाम सुरु झाला असून यामुळे वाशी मार्केटला जाण्यासाठी आंबा वाहतुक करणाऱ्या गाडयांसाठी कशेडी घाटातील बोगदा सुरु करण्यात यावा. अशी मागणी वाशी मार्केटमधील मुख्य व्यापारी व मराठी बाणाचे अशोक हांडे यांनी केली आहे. देवगड हापूस आंब्याचा हंगाम सुरु झाला असून देवगड तालुक्यातून सदया सुमारे 50 ते 60 हून अधिका आंबा वाहतुक करणारे ट्रक दररोज वाशी मार्केटला रवाना होत आहेत. वाशी मार्केटला जाण्यासाठी सुमारे 8 ते 10 तास लागत आहेत. कशेडी बोगदा वाहतुकिसाठी खुला केल्यास वाशी मार्केटला जाण्यासाठी दोन तासाचा वाहतुकिचा कमी प्रवास होणार आहे. यामुळे सकाळी 9 ते 10 वाजता वाशी मार्केटला जाणाऱ्या आंबा सर्व्हिसच्या गाडया सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत पोहचू शकतात यामुळे आंब्याची विक्रीही सकाळी चांगली होवू शकते.उष्णतेमुळे आंबा साका होण्याचे प्रमाण काहि वर्षामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. सकाळी 8 च्या नंतर आंबा वाहतुक उष्णतेमधून केल्यास याचा परिणाम आंब्यामध्ये साका निर्माण होवून खराब होण्याचे प्रमाण वाढते यामुळे कशेडी घाटातील बोगदा आंबा वाहतुकिसाठी खुला करण्यात यावा याचा फायदा आंबा बागायतदारांना होणार असल्याचे मत वाशी मार्केटमधील मुख्य आंबा व्यापारी (दलाल) अशोक हांडे यांनी व्यक्त केले.