लोकसहभागातून मिळाल्या आहेत खुर्च्या टेबल
फणसगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी उधळला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा मनसुबा
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोकसहभागातून मिळालेल्या नवीन खुर्च्या टेबल देवगड मधील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात नेण्याचा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांचा मनसुबा फणसगाव पंचक्रोशीतील सजग नागरिकांनी उधळला. विशेष म्हणजे फणसगाव पीएचसीची ऍम्ब्युलन्स मधून हे सामान भरून देवगडला नेण्यात येणार होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी तोंडी आदेश देत सदर सामान देवगडला आणण्यास संगीतल्यावरून सदर सामान देवगडला नेण्यात येणार होते. अम्ब्युलन्स मध्ये खुर्च्या आदी साहित्य भरण्यात आले होते. मात्र स्थानिक नागरिकांनी याला आक्षेप घेतला. भाजपा कार्यकर्ते बंड्या नारकर, फणसगावचे उपसरपंच उदय पाटील, गोवळ माजी सरपंच राजेश जठार, बाबा नारकर यांनी ऍम्ब्युलन्स अडवत सर्व साहित्य पूर्ववत फणसगाव पीएचसीत ठेवायला भाग पाडले. सदर साहित्य हे शासनाने दिलेले नसून लोकसहभागातून मिळालेले आहे. पीएचसीची नूतन इमारत बांधणाऱ्या ठेकेदाराने ग्रामस्थांच्या मागणीनुसार सामाजिक बांधिलकी जोपासत नवीन खुर्च्या टेबल आदी साहित्य पीएचसीला भेट दिले. मात्र लोकसहभागातून फ़णसगाव पीएचसीला मिळालेले हे साहित्य देवगड मध्ये नेण्याचा हेतू काय ? तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सामान हलविण्याबाबत लेखी आदेश का दिले नाहीत ? आणि साहित्य वाहतुकीसाठी चक्क ऍम्ब्युलन्सचा वापर करण्याची हिंमत कशी केली ? असे सवाल जनतेतून होत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक ,जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत कारवाई करावी अशी मागणी स्थानिक जनतेतून होत आहे.













