संदिप परब यांनी स्वहस्ते केली बांधवाची सेवा
खारेपाटण (प्रतिनिधी) : उत्तरप्रदेशातील एक तरूण व अनोळखी मनोरूग्ण बांधव पणदूर ब्रीज परिसरात भटकत असल्याचे संविता आश्रमचे विजया नाईक यांना आढळून आले.त्यानंतर आश्रमचे आशिष कांबळी,विजय नाईक व नरेश आंगणे यांनी तात्काळ सदर बांधवाला रितसर कुडाळ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून संविता आश्रमात दाखल केले.आश्रमात दाखल होताना बांधवाचे डोक्याचे केस अस्ताव्यस्त वाढलेले, पिंजारलेले होते. जीवन आनंद संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष संदिप परब यांनी दि.४ एप्रिल,२०२४ रोजी सकाळी स्वहस्ते बांधवाचे केस कटिंग करून दाढी केली. यावेळी बांधव मुका असल्याने बोलू शकत नसल्याचे समजले. मात्र त्याने त्याचे नाव निटू व गाव बसायच जि.मु.नगर असे वहीवर लिहून दाखविले.
निटूने दिलेल्या माहितीवरून संविता आश्रमच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ त्याचे उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील ससायंच ग्रामपंचायतीतील बसायच गाव शोधून काढले. ग्रामपंचायतचे सरपंच राजकुमार यांचेमार्फत बांधवाचा भाऊ बबलू याचेशी संपर्क करण्यात आला. निटू हा इ.१० वी पर्यंत शिकला असून त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याने तो गेल्या दोन महिन्यांपासून वेडाच्या भरात घरातून निघून गेल्याचे भाऊ बबलू याचेकडून सांगण्यात आले. गेले दोन महिन्याहून अधिक काळ निटू हा बांधव मनोरूग्णावस्थेत रस्त्यावर निराधार व वंचिततेचे जीवन जगत होता. आता संविता आश्रमात शांतपणे राहत असून त्याची अन्न वस्त्र निवा-याची गरज पुर्ण झाली आहे. आश्रमातील सेवा कर्मचारी त्याची काळजी घेत आहे.














