गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात खारेपाटण मधील आरोपी अब्दुलगणी हाजिगफर मेमन चा जामीन फेटाळला ; मेमन च्या जेलमुक्कामात वाढ

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात खारेपाटण येथील आरोपी अब्दुलगणी हाजिगफर मेमन चा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी अब्दुलगणी मेमन याच्या ताब्यातून 55 हजार 460 रुपयांचा अवैध गुटखा आणि सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ फूड अँड ड्रग्ज चे सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके यांनी 19 जानेवारी 2024 रोजी जप्त केला होता.याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात मेमन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी मेमन याने जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याला जोरदार हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. आरोपी अब्दूलगणी मेमन याच्यावर याआधीही 2019 मध्ये अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असून आरोपी कायद्यास न जुमानणारा सराईत गुन्हेगार आहे, आरोपीने गुन्हा केल्याचे मान्य केले असून नशाकारक व अपथ्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगला होता, आरोपीला जामीन मिळाल्यास पुन्हा तो असाच गुन्हा करण्याची शक्यता आहे, गुन्ह्याचा तपास सुरू असून जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर  दबाव आणू शकतो, आरोपीला जामीन मिळाल्यास समाजात अशा गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहणार नाही आणि समाजात व्यसनाधीनता वाढेल. सरकारी वकील रुपेश देसाई यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर जिल्हा न्यायाधीश गायकवाड यांनी आरोपी मेमन चा जामीन अर्ज फेटाळला.

error: Content is protected !!