पाण्याच्या शोधात जंगली प्राणी गवा रेडा, बिबट्या  लोकवस्तीकडे

वैभववाडी तालुक्यातील एडगाव, बायंबोशी, सांगुळवाडी परिसरात गवा रेड्यांचा कळप दाखल

वनविभागाच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम जलाशयांची निर्मिती करण्याची आवश्यकता

अपघातापासून बचावासाठी परिसरातील विहिरींना संरक्षणभिंत अथवा पर्यायी व्यवस्था करण्याची गरज

वैभववाडी (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा जोरदार जाणवत आहे. तर हवामान खात्याने देखील येत्या काही दिवसात उष्णतेत वाढ होण्याबाबत अंदाज वर्तवीला आहे. सध्या शितपेयांची दुकाने ग्राहकांनी गजबजून गेलेली दिसत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर दुतर्फा असलेल्या वृक्षांची बेसुमार कत्तल झाली असल्यामुळे वाटसरू, प्रवासी यांना उन्हात सहजासहजी सावलीसाठी आसरा देखील मिळणे आता कठीण झाले आहे. जसं जसा मे महिना जवळ येत आहे तसे वैभववाडी तालुक्यातील किंबहुना जिल्ह्यातील नद्या, विहीरी, जलाशये यांनी तळ गाठलेला निदर्शनास येत आहे. 

वाढत्या उन्हामुळे वैभववाडी परिसरात असलेल्या जंगलातील जंगली प्राणी तसेच गवा रेड्यांचा कळप वैभववाडी शहरालगत असलेल्या एडगाव,वायंबोशी, सांगुळवाडी परिसरात फिरताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत. परीणामी स्थानिक बागायतदार चिंतेत आहेत तर नागरीकांमध्ये भितीचे वातावरण देखील पहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी एडगाव वायंबोशी येथे गवा रेडा ( मादी ) विहीरीत पडल्याचे आढळून आली  होती तर त्याच वेळी एक गवा रेडा मृतावस्थेत देखील आढळला होता. शिवाय अचिर्णे येथे रेल्वेला धडक बसून एक गवा मृत्युमुखी देखील पडला होता.सध्या पुन्हा या उन्हाळ्यात हे जंगली प्राणी पाण्याच्या शोधात जंगलाकडून ग्रामीण वस्तीकडे येत असल्याने यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. वनविभाग व स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून गावापासून काही अंतरावर कृत्रिम जलाशये तयार करणे सध्या गरजेचे आहे. जेणेकरून जंगली प्राण्यांना पाणी मिळेल व ग्रामीण भागाकडे येण्याचे प्रमाण कमी होईल परिणामी अपघात देखील टळू शकतील. सदर परिसरातील विहिरींना संरक्षणभिंत अथवा कंपाऊंड किंवा अन्य उपाय योजना कराव्यात जेणेकरून जंगली प्राणी विहीरीत पडणार नाहीत. वैभववाडी वनविभागाच्या वतीने कृत्रिम जलाशये, व अन्य उपाय योजना वेळीच राबविल्यास मनुष्य वस्ती व जंगली प्राणी या दोघांनाही त्याचा फायदा होणार आहे.

error: Content is protected !!