” भ.बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग मनुष्याला कल्याणाकडे नेणारा ” – भंते कोंडिन्य थेरो,नागपूर
खारेपाटण (प्रतिनिधी) : “मनुष्याच्या जीवनात किंबहूना जगात सर्वत्र दुःख आहे.या दुःखाला कारण देखीलआहे. तर दुःख निवारण आहे.व दुःख निवरण्याचा मार्ग देखील आहे.या चार आर्य सत्याच्या माध्यमातून भ. बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग मनुष्याला कल्याणाकडे घेऊन जाणारा आहे.”असे भावपूर्ण उदगार बौद्ध धर्माचे भिख्खू – भंते कोंडिन्य थेरो यांनी खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्ध विहारात आयोजित करण्यात आलेल्या धम्म प्रवचन कार्यक्रमात काढले.
भंते कौंडिन्य थेरो हे शांतीदूत बुद्ध विहार नागपूर येथे वास्तव्यास असून नुकतेच ते कोकण प्रांतात धम्म प्रवचन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता त्यांनी सोमवारी मराठी नव वर्षाच्या पूर्व संध्येला फाल्गुन अमवास्येला खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्ध विहाराला सदिच्छा भेट दिली.व येथील धम्म बांधवांना धम्म देसना दिली.यावेळी त्यांच्या समवेत उपासक भरत नाईक,सुमेध नाईक उपस्थित होते.
खारेपाटण पंचशील नगर येथील पंचशील विकासा मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळाच्या वतीने बुध्द विहार खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे माजी अध्यक्ष पत्रकार संतोष पाटणकर, खारेपाटण बौध्दजन सेवा संघाचे सहसचिव सागर पोमेडकर, राजापुर तालुका बौध्द सेवा संघाचे बौद्धचार्य महेंद्र पवार,खारेपाटण बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण चे बौध्द उपासक – संतोष मधुकर पाटणकर,स्थानिक मंडळाचे उपध्यक्ष जितेंद्र कदम,खजिनदार संदीप पाटणकर,संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण च्या अध्यक्षा आकांशा पाटणकर,सचिव आरोही पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारात भ.बुद्ध यांच्या मूर्तीला भंते कौंडिन्य थेरो यांच्या शुभहस्ते पुष्प अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदनेने धम्म प्रवचन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. यामध्ये पंचशील नगरातील सर्व महिला – पुरुष,युवक – युवती,जेष्ठ नागरिक लहान मुले यांनी सहभाग घेतला होता.यावेळी भंते कौंडिन्य थेरो यांनी चार आर्य सत्य याबरोबरच आर्य अष्टांगिक मार्ग सांगून बौद्धांनी आपले जीवन कसे जगावे याचे अमुल असे मार्गदर्शन केले.तसेच ते.पुढे म्हणाले ‘खारेपाटण पंचशिल नगर येथील बुद्ध विहार हे फार सुंदर आणि छान पवित्र बुद्धविहार असून येथे आल्याने आपल्याला खूप समाधान वाटले.आपली बुद्धविहारे ही आपली धम्मशाळा असून ती अशा प्रकारे सुंदर आणि नीटनेटकी असायला हवी.तसेच यामधून धम्माचे ज्ञान देत बौध्द आचरणशिल विद्यार्थी घडवले गेले पाहिजेत.’ असे देखील.भंते कौंडिन्य थेरो यांनी शेवटी सांगितले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री संतोष पाटणकर यांनी मानले.
















