हक्काचा खासदार निवडून देण्यासाठी नारीशक्ती ची करणार एकजूट
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : लोकसभा निवडणूक अगदी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या मैदानात प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. केंद्रीयमंत्री राणेंच्या साथीला आता पत्नी नीलम राणे हासुद्धा प्रचारात उतरल्या असून नीलम राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महिला मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे. अब की बार चार सौ पार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निहाय, तालुका निहाय आणि आता जिल्हा परिषद विभाग निहाय महायुती कार्यकर्ता संवाद मेळावे घेत आहेत. त्यांच्यासोबत माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे हे दोन्ही पुत्र प्रचार यंत्रणा राबविण्यात आणि मतदारांपर्यंत पोचण्यासाठी कटाक्षाने मेहनत घेत आहेत. आता केंद्रीयमंत्री राणेंच्या साथीला पत्नी नीलम याही प्रचार मैदानात उतरल्या असून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हापरिषद विभाग निहाय महिला लाभार्थी मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे. स्वतः नामदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह आता नीलम राणे याही प्रचारात उतरल्यामुळे अवघे राणे कुटुंब इलेक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. जरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा महायुती चा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी स्वतः नारायण राणे हे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून महायुती कार्यकर्ता मेळाव्यात मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी आपला घरचा हक्काचा खासदार निवडून देण्यासाठी केंद्रीयमंत्री राणे महायुती च्या मेळाव्यांतून आवाहन करत आहेत. अशा वेळी संपूर्ण राणे कुटुंब इलेक्शन मोडवर आल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरलेले दिसून येत आहे.













