खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त खारेपाटण पंचशील नगर येथील पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या वतीने इयत्ता ४ थी ते ७ वी या गटातील शालेय विद्यार्थ्यांकरिता सामान्य ज्ञान स्पर्धा जि.प.केंद्र शाळा खारेपाटण येथे आज शनिवार दी.१३ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आल्या.
या स्पर्धेचे उद्घघाटन पंचशील विकास मंडळ खारेपाटण या मंडळाचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष श्री जितेंद्र कदम,खजिनदार संदीप पाटणकर, संदेशवाहक – धीरज जुमलेकर, बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे सहसचिव श्री सागर पोमेडकर,खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याद्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर,शाळेच्या शिक्षिका श्रीम.रुपाली पारकर,अलका मोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र कदम व खजिनदार संदीप पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचे खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याद्यापक श्री प्रदीप श्रावणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या सामान्य ज्ञान स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी मार्गदर्शन करताना संतोष पाटणकर म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे महामेरू होते.त्यांच्या विचार प्रेरणेतून विद्वान ज्ञानी विद्यार्थी घडावेत व बाबासाहेबांचे सामाजिक कार्य शालेय विद्यार्थी पर्यंत पोहचावे. म्हणून अशा प्रकारच्या बुध्दीला जोड देणाऱ्या स्पर्धा मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व पारितोषिक वितरण कार्यक्रम रविवार दी.१४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता बुद्ध विहार पंचशील नगर, खारेपाटण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संपन्न होणार असल्याचे पंचशील विकास मंडळ खारेपाटण च्या वतीने सांगण्यात आले. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी मानले.











