रेडी पोर्ट मध्ये राणेंचे कौटुंबिक संबंध

विनायक राऊत यांचा पलटवार

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आडेली व शिरोडा येथे प्रचारसभा संपन्न झाली. याप्रसंगी सभेला संबोधित करताना विनायक राऊत यांनी माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांची पोलखोल करत आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले. त्याचप्रमाणे रेडी पोर्ट हे नारायण राणे यांचेच अपत्य असून तिथे त्यांचे कौटुंबिक लागेबंध आहेत असेही सांगितले. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या कोकण द्वेशामुळे आज कोकणातील पाच जिल्ह्यांवर सिडको चे संकट घोंगावत आहे व त्याचे दुष्परिणाम काय होणार याबाबत लोकांना जागृत केले. आपल्या सरकारच्या काळात मंजुरी मिळालेले जिल्ह्यात होऊ घातलेल्या कॅथलॅब केवळ राज्य सरकारच्या ढिम्म कारभारामुळे जिल्ह्यातून बाहेर सोलापूरला गेले. आपल्याच काळात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज अनेक सामान्य घरातील मुलांना शिक्षण मिळत आहे व येणाऱ्या काळात त्याचा आपल्या जिल्ह्याला नक्की फायदा होणार असेही सांगितले.

याप्रसंगी शिवसेना उपनेत्या जान्हवी सावंत यांनी केंद्र व राज्यसरकारच्या फसव्या योजनांचा परदाफाश केला, व त्याचबरोबर फसवणूक थांबवण्यासाठी भाकरी फिरवणे गरजेचे आहे असे सांगितले. सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख मान. शैलेश परब यांनी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्याच कार्य काळात मतदारसंघाचे सर्वाधिक नुकसान झाले असे सांगितले तर निलेश राणे यांनी केलेल्या आरोपा वर भाष्य करताना तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर जेटी वर पाहणी दौरा आयोजित केला होता ज्यानंतर स्थानिकांना तेथे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असे सांगितले. राष्ट्रवादी च्या सौ. अर्चना घारे मॅडम यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करताना येणाऱ्या निवडणुकीत मशाल चिन्हसमोरील बटण दाबून विनायक राऊत यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आव्हान केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष इर्शादभाई शेख यांनी वाढत्या महागाईवर भाष्य करताना भाजपने आश्वासन दिलेलं एक ही लोकोपयोगी काम आजवर केले नसून केवळ देशात महागाईचा आगडोंब उसळला असल्याचे सांगितले. सन्मा. प्रवीणभाई भोसले यांनी याप्रसंगी श्री विनायकजी राऊत यांच्या कार्याचा गौरव करताना कोकणातील राजकीय दहशत संपुष्टात आणून कोकणाला शांततेकडे घेवुन जाण्यात विनायक राऊत यांचे योगदान मोलाचे आहे असे सांगितले त्याचप्रमाणे विनायक राऊत यांच्या दोन्ही मुलांचे कौतुक करून दोघे कसे विनम्र व सुसंस्कारी आहेत असे सांगताना याच्या अगदी उलट परिस्थिती भाजप उमेदवाराची आहे असे सांगितले.

याप्रसंगी सर्वश्री प्रवीण भोसले, शैलेश परब, इर्शाद शेख, श्री चमणकर, संजय पडते, बाळा गावडे, जान्हवी सावंत,अर्चना घारे आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!