राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधवांच्या घरात चोरी; बेडरूम ला बाहेरून कडी घालून केली चोरी
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत चोरांचा सुळसुळाट झाला असून सलग तिसऱ्या दिवशी कणकवलीत घरफोडी झाली आहे. 24 एप्रिल रोजी भल्या पहाटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव यांच्या कलमठ शिक्षक कॉलनी येथील घरात चोरी झाली. विशेष म्हणजे घरात माणसे असताना बेडरूम ला बाहेरून कडी लावून चोरांनी चलाखी ने चोरी केली आहे. रुपेश जाधव आणि त्यांचा भाऊ आपापल्या बेडरूम मध्ये झोपले असताना बेडरूम ला बाहेरून कडी लावत चोरांनी हातसफाई केली. रुपेश जाधव यांनी गुढीपाडव्याला 15 दिवसांपूर्वी खरेदी केलेली टिव्हीएस स्पोर्ट्स मोटरसायकल तसेच घरातील किंमती ऐवज चोरट्यानी चोरला आहे. 24 एप्रिल रोजी भल्या पहाटे ही चोरी झाल्याचे समजते. चोरीची कल्पना जाधव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात देताच कणकवली पोलिसांनी सकाळी घटनास्थळी जात पाहणी केली आहे. चोरीची फिर्याद पोलिसांत दाखल करण्याचे काम सुरू आहे.











