शिक्षक अधिकारी निवासी शिबिर छ. शाहू क्रीडा संकुल सातारा येथे संपन्न
राज्य समादेशक अनिल कुंभार, जिल्हा समादेशक किशोर सोनसुरकर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष वामन तर्फे यांनी प्रशिक्षणार्थींचे केले अभिनंदन
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण ( आर.एस.पी. व सी.डी. ) या विषयाचे शिक्षकांचे राज्यस्तरीय निवासी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी चे शिक्षक मंदार चोरगे व संगिता पाटील तसेच सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल, वेंगुर्ला विद्यालयाच्या धनश्री नाईक यांनी सदर प्रशिक्षण पुर्ण केले. आर.एस.पी.अधिकारी म्हणून सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, माध्य.शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, महासमादेशक अनिल कुंभार, अध्यक्ष राजेंद्र पाटील, शिबिराधिकारी उमेश देशमुख यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र सातारा ट्रॅफिक इन्चार्ज अभिजित यादव व सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या उपस्थितीत सदर प्रशिक्षणार्थींना देऊन सातारा येथे गौरविण्यात आले.
विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांचे कार्यालय, नवी मुंबई व शिक्षण संचालनालय मार्फत महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन, कोल्हापूर या संघटनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या समन्वयातून गुरूवार दि.९ मे २०२४ पासून छत्रपती शाहू क्रीडा संकुल सातारा येथे ( आर.एस.पी ) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात सातारा पोलीस डी.जे. ब्रिजलाल तडवी, ए.एस.आय. आर. व्ही.दळवी. सेवानिवृत्त ए.एस.आय.डी.जे. मानीक नलावडे, सातारा शहर समादेशक संजय अहिरेकर, रविंद्र यादव, जिल्हा समादेशक सी.बी.साळुंखे, आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ.घारे, सांगली शहर समादेशक ओमकार पाटील, सातारा जिल्हा माजी समादेशक व व्याख्याते मधुकर शेंबडे, सातारा वाहतूक शाखेचे अधिकारी संग्राम देवणे, आनंद रोकडे, रायगड समादेशक पुर्वा गुरव यांनी प्रशिक्षणार्थींना वाहतूक नियम, अग्निशमन, प्रथमोपचार, पदकवायत याविषयी मार्गदर्शन केले.
आजच्या शहरी व ग्रामीण भागामध्ये वाहतूक जलद व मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. रस्ते अपघाता मध्ये जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होताना दिसते. यासाठी रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण हा शालेय विषय (आर. एस.पी. ) राज्यातील सर्व शाळांमधून प्रभावशाली राबवून नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाद्वारे वाहतूक नियंत्रण, पदकवायत, अग्निशमन, नागरी संरक्षण, प्रथमोपचार व बचाव कार्य याविषयी शिक्षण प्रशिक्षण दिले जाते. या विषयांतर्गत राष्ट्रीय एकात्मक नेतृत्व , सेवाभावी वृत्ती हे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी बानवले जातात. प्रशिक्षीत शिक्षक, विद्यार्थी यांच्या माध्यमातून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह, राष्ट्रीय सण, धार्मिक सण, स्थानिक उत्सव, काळात त्यांचा सहभाग समाज घटकांना फायदेशीर ठरू शकतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींचे निवासी प्रशिक्षण यशस्वी पुर्ण केल्या बद्दल सिंधुदुर्ग आर.एस.पी. जिल्हा समादेश किशोर सोनसुरकर, उप जिल्हा समादेशक . अजित जगदाळे व जिल्हा महिला प्रमुख आर.एस.पी.शमा वायंगणकर इतर जिल्हा आर.एस.पी. अधिकारी व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रशिक्षणास सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष वामन तर्फे व सचिव गुरुदास कुसगांवकर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.












