संतोष हरयाण, आत्माराम हरयाण यांच्या जेलमुक्कामात वाढ
ऍड. गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा पोलीस दुरक्षेत्राचे ऑन ड्युटी पोलीस हवालदार शैलेश कांबळे यांना मारहाण करणाऱ्या संतोष रामचंद्र हरयाण, आत्माराम रामचंद्र हरयाण या बंधूंचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश डॉ. सानिका जोशी यांनी फेटाळून लावला. या कामी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. 29 एप्रिल रोजी ऑन ड्युटी पोलीस हवालदारला वरील दोन्ही आरोपींसह अन्य आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली होती. याबाबत पीडित पोलीस हवालदार यांच्या फिर्यादीनुसार ऍट्रोसीटी ऍक्ट सह आयपीसी कलमानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती.न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीनी जामीन अर्ज दाखल केला होता. त्याला हरकत घेताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी पुढील युक्तिवाद केला. संतोष हरयाण व आत्माराम हरयाण हे या गुन्ह्यात मुख्य आरोपी आहेत. त्यांची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून संतोष हरयाण विरोधात चार गुन्हे दाखल आहेत. ऑन ड्युटी पोलीस अंमलदारावर जर हे आरोपी हात उचलत असतील तर सामान्य लोकांबरोबर कसे वागत असतील ? या गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू आहे.त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीना जामीन मंजूर करू नये. तोडकरी यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर संतोष हरयाण व आत्माराम हरयाण या दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.












