शाळा हे संस्कार केंद्र आहे या संस्कार केंद्रातच विद्यार्थ्यावरती संस्कार केले जातात – मुख्याध्यापक  सुनिल घस्ती

देवगड (प्रतिनिधी) : शाळा हे संस्कार केंद्र आहे या संस्कार केंद्रातच विद्यार्थ्यावरती विविध संस्कार केले जातात .विविध प्रकारचे दिन व थोरामोठ्यांच्या जयंत्या साजऱ्या करण्या पाठीमागे  त्यांच्या कार्यापासून विचारापासून प्रेरणा घ्यावी हाच एक हेतू असतो .माजी मुख्याध्यापक  नारायण माने सर यांनी एक ऑगस्ट 1988 पासून 31 मे 2024 पर्यंत जी अखंड सेवा केली . त्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले . अनेक दुर्मिळ गुण माने सरांच्या स्वभावामध्ये आपल्याला पहावयास मिळतात .सहजता , परोपकार , सामंजस्य , दुसऱ्याला आपलं करण्याची वृत्ती या सदगुणामुळे ते दुसऱ्यांच्या मनात घर करून राहिले  .या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यातून आपणही प्रेरणा घ्यावी असे मत अ . कृ. केळकर हायस्कूल वाडा प्रशालेचे मुख्याध्यापक   सुनिल घस्ती यांनी  सेवानिवृती निमित्त समारंभात भावोद्गार काढले .

वाडा येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूल येथे माजी मुख्याध्यापक  नारायण माने यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ  नुकताच प्रशालेच्या सभागृहात सकाळी ११.३० वाजता करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई संस्थेचे उपाध्यक्ष  सदानंद पवार, तसेच प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे संयुक्त कार्यवाह व देणगीदार  निरंजन दीक्षित, संस्थेचे सरचिटणीस  शंकर धुरी, स्थानिक समितीचे अध्यक्ष  शांताराम पुजारे, कार्यवाह  दिनकर जोशी, देवगड एज्युकेशन बोर्डाचे समन्वयक  विजयकुमार फडके, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष  श्रीनिवास मराठे, मांजरेकर, अयोध्याप्रसाद गावकर आदी मान्यवर  उपस्थित होते.

दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सत्कारमूर्तीचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. या नंतर प्रशालेचे मुख्याध्यापक  सुनील घस्ती यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थित पाहण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सत्कारमूर्ती  नारायण माने व  माने यांचा संस्थेतर्फे व प्रशालेतर्फे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  नारायण माने यांनी आजवरच्या आपल्या कार्यकाळाचा आढावा घेत आपल्या या यशस्वी प्रवासाचे श्रेय आपले सहकारी, संस्थाचालक व आपले कुटुंबीय यांना देऊन या सर्वाच्या प्रेमामुळे, सहकार्यामुळेच मी इथवर येऊ शकलो व माझे काम यशस्वीपणे पूर्ण करू शकलो असे भावोद्गार काढले. तसेच या सर्वांचे सहकार्य आपल्याला पुढेही मिळत राहील व आपण शिक्षण क्षेत्रासाठी या पुढेही काम करणार असल्याचे जाहीर केले. तसेच शाळेसाठी भरघोस अशी २५ हजार रुपयांची देणगी देण्याचीही घोषणा त्यानी केली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष  सदानंद पवार यांनी  माने यांच्या  व्यक्तिमत्वाचा आढावा घेत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे  दीक्षित यांनी  माने यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असून त्यांच्या अनुभवाचा फायदा शिक्षण क्षेत्राला यापुढेही व्हावा यासाठी आपल्या उपक्रमशील संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनीही  माने यांच्या कार्यकाळाचा आढावा घेत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी मंचावर सर्व संस्था प्रतिनिधी, विविध समित्यांचे प्रतिनिधी, पत्रकार प्रतिनिधी,  माने यांचे कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका  स्मिता तेली यांनी केले. तर पाहण्यांची ओळख सहा. शिक्षिका  प्रीती चौगुले यांनी करून दिली व आभार प्रदर्शन सहा. शिक्षक मिलिंद लेले यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी यांनी मेहनत घेतली.

error: Content is protected !!