कणकवली (प्रतिनिधी) : सध्या पाऊस जोरदार सुरू असल्याने चिकन प्रेमी खवय्यांच्या तोंडालाही पाणी सुटत आहे. असाच एक बिर्याणीखवय्या कणकवली शहरातील हॉटेलमध्ये बिर्याणीवर ताव मारायला गेला पण बिर्याणी खाण्याच्या नादात 40 हजारांचा मोबाईल हँडसेट गमावून बसण्याची वेळ त्याच्यावर आली. आणि हडबडलेल्या अवस्थेत भर पावसात भिजत त्याने पोलीस ठाणे गाठले आणि आपली कैफियत मांडली. झाले असे की शहरातील डीपी रोड वर असलेल्या एका तंदुरी कम बिर्याणी सेंटरमध्ये हा खवय्या आज सायंकाळी बिर्याणी खायला गेला.बिर्याणी खायच्या नादात त्याने गेल्या महिन्यात 40 हजार रुपयांना खरेदी केलेला आपला मोबाईल टेबलवर ठेवला. पण बिर्याणी खाऊन होईस्तोवर त्याचा मोबाईल मात्र गायब झाला होता.इकडेतिकडे शोधाशोध करूनही मोबाईल सापडून आला नाही आणि बाहेर धो धो पाऊस पडत असतानाही ह्याला घाम फुटला. तशाच अवस्थेत त्याने भर पावसात भिजत पोलिस ठाणे गाठले आणि आपला मोबाईल बाबत घडलेली कैफियत मांडली. पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू होती.
बिर्याणी पडली 40 हजार ला












